राजगुरूनगर : हुतात्मा राजगुरू सायकलिस्ट क्लब व खेड तहसील यांच्या संयुक्त विद्यमानाने मतदान जनजागृती सायकल राईडचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये हुतात्मा राजगुरू सायकलिस्ट क्लब मधील ३० ते ३५ सदस्यांनी सहभाग नोंदवला. या सदस्यांनी ‘ मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ अशा विविध घोषणा देऊन मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली.
मतदान जनजागृती सायकल राईड सकाळी आठ वाजता राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू, सुखदेव, भगतसिंग स्मारक यांच्या स्मृतिशिल्पास तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर ही रॅली बाजारपेठ मार्गे प्रांत ऑफिसकडून चांडोली मार्गे चाकण एसटी स्टँड, छत्रपती शिवाजी विद्यालय, चाकण नगरपरिषद व मार्केट यार्ड या ठिकाणी “मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो ” अशा विविध घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली. तसेच तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी मतदान जनजागृती संदर्भात सर्वांना आवाहन केले की, सर्वांनी आपला मतदानाचा अधिकार हा बजावला पाहिजे. त्यानंतर रॅली पुन्हा चाकणमधून राजगुरुनगर पंचायत समिती या ठिकाणी येऊन थांबली.
रॅलीत या मान्यवरांचा सहभाग
या रॅलीमध्ये तहसीलदार वैशाली वाघमारे व इतर कर्मचारी वर्ग, तसेच हुतात्मा राजगुरू सायकलिस्ट क्लबचे अध्यक्ष, निलेश काळे, सचिव, अजित गायकवाड, खजिनदार, दीपक कोराळे, सुनील धुमाळ, मयूर हांडे, जालिंदर मलघे, रवींद्र पवार, रवींद्र चंदन, अतुल दौंड, लक्ष्मण नलावडे, तुषार महाले, कौस्तुभ कहाणे, दादाभाऊ कोळेकर, रुपेश रसाळ आदींनी मतदान जनजागृती रॅलीत सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.