25 वर्षांची प्रतीक्षा आता संपणार, पिंपरी-चिंचवडमध्ये होणार नाट्य संकुल; अजित पवारांची घोषणा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील रंगकर्मींची गेल्या पंचवीस वर्षांपासूनची मागणी अखेर ऐरणीवर आली आहे. शहरात स्वतंत्र नाट्य संकुल उभारण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी चिंचवड येथे केली.
शहरामध्ये ७९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन १९९९ मध्ये झाले होते. तेव्हापासूनच नाट्यसंकुलाची मागणी रंगकर्मी सातत्याने मांडत होते. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये या मागणीचा सूर उमटत राहिला. मात्र, राज्यकर्त्यांकडून या विषयाकडे दुर्लक्षच होत होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वर्धापन दिन सोहळ्यात या विषयाचा धागा ज्येष्ठ गायक पं. सुरेश साखवळकर यांनी पकडला.
त्यानंतर पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी नाट्यकलेच्या संवर्धनासाठी नाट्यसंकुलाची गरज अधोरेखित केली. रंगकर्मी अशोक हांडे यांनीही आपल्या मनोगतात ‘शहरात शरद नाट्य संकुल व्हावे’, अशी ठाम मागणी केली.
अजित पवारांची घोषणा
या मागण्यांना प्रतिसाद देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवडमध्ये नाट्य चळवळ वेगाने वाढत आहे. अनेक वर्षांपासून कलावंत नाट्यसंकुलाची मागणी करत आहेत. आता हे संकुल उभारण्यात येणार असून, सोमवारी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याशी बैठक घेऊन यासाठी योग्य जागा निश्चित करण्याची कार्यवाही केली जाईल. कला आणि कलावंतांच्या संवर्धनासाठी नाट्यसंकुल तातडीने उभारणे गरजेचे आहे’.
नाट्यसंकुल रंगकर्मींसाठी ऐतिहासिक ठरणार
शहरात उभारण्यात येणारे नाट्यसंकुल रंगकर्मींसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. औद्योगिक ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडला सांस्कृतिक नगरीचा नवा दर्जा मिळवून देण्यास हे संकुल महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वासही व्यक्त होत आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही एक मराठी नाट्य संघटना
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही एक मराठी नाट्य संघटना आहे, जी दरवर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे आयोजन करते. तत्कालीन मुंबई राज्यात मराठी नाटके सादर करणाऱ्या अनेक नाट्य कंपन्या होत्या. या नाट्य कंपन्यांना एका समान व्यासपीठावर आणता यावे आणि त्यांच्या समस्या सोडवता याव्यात यासाठी त्यांनी मराठी नाट्यगृहासाठी एक केंद्रीय संस्था स्थापन करण्याची कल्पना मांडली. अखेर अनेक नाट्य कंपन्यांनी वार्षिक परिषदेला सहमती दर्शविली.