लाडकी बहीण योजनेत पुरुषांची 'एंट्री'; तब्बल 'इतक्या' पुरुषांनी घेतला लाभ, 24 कोटींचा बसला फटका (File Photo : Ladki Bahin Yojana)
वाई : वाईतील लॉंग मार्चचा आठवा दिवस सुरु आहे. या आठव्या दिवशीही कुसगाव, एकसर, व्याहळी आणि बोरीव या गावांतील असंख्य महिला आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आहेत. या महिलांनी सरकारविरोधी एक ऐतिहासिक निर्णय घेण्याचा निर्धार केला आहे.
ज्या राज्य शासनाला मागच्या आठ दिवसांमध्ये आमची थोडीही दया आली नाही, ज्यांना आमच्या डोळ्यातील अश्रू, आम्हाला होणारा त्रास दिसला नाही ते सरकार आम्हाला न्याय देऊन आमचा सन्मान करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणारा सन्मान निधी नको, असा निर्धार महिलांच्या वतीने करण्यात आला.
सूस रोडपासून वाकडपर्यंतचा आजच्या दिवसाचा 12 किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करत वाईपासून ११६ किलोमीटर अंतर आंदोलनकर्त्यांनी पूर्ण केलं. आजही वाई तालुक्यातील विविध सामाजिक राजकीय संघटनांनी लाँग मार्चला आपला पाठिंबा दर्शवला. या लॉंग मार्चला पश्चिम भागासह वाई तालुक्यातील सर्व स्तरावरून पाठिंबा मिळताना दिसत आहे.
वाई तालुक्यातील घराघरात गल्लीबोळात चौकाचौकात या आंदोलनाची जोरदार चर्चा सुरू आहे. आंदोलनकर्त्यांचे होणारे हाल वर्तमानपत्र व सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे सर्वच स्तरावरून मोठ्या प्रमाणात पाठिंबा या आंदोलनाला मिळत आहे.
अनेक संस्था वाई तालुक्यातील अनेक युवक वैयक्तिक स्तरावरती या आंदोलनाला सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. आंदोलनकर्त्यांच्या राहण्याच्या सोयींपासून ते जेवणापर्यंत सर्व सुविधा पुरवण्याचे जोरदार नियोजन गावागावात सुरू आहेत. ज्यांना आंदोलनस्थळी येता येत आहे, ते त्या ठिकाणी पोहोचत आहेत. ज्यांना शक्य नाही ते वेगवेगळ्या स्वरूपाने या आंदोलनाला मदत करत आहेत. मात्र, आंदोलनकर्त्यांच्या वेगळ्याच मागणीने तालुक्यातील अनेकांच्या डोळ्यात पाणी आले.
आम्हाला अन्न, पाणी, राहण्याच्या सोयीपेक्षा तुमच्या-आमच्यासोबत या लॉंग मार्चमध्ये येण्याने आम्हाला खऱ्या अर्थाने बळ मिळेल, अशी भावनिक साद या आंदोलनकर्त्यांनी वाई तालुक्यातील नागरिकांना घातली आहे. यावर येणाऱ्या काळात कशा स्वरूपाचा प्रतिसाद मिळतो हे पाहावे लागणार आहे.






