संग्रहित फोटो
पुणे : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील हे लाखो मराठा समर्थकांसह मुंबईकडे निघाले आहेत. यामुळे राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जरांगे पाटील यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून मराठा बांधव हे थेट आता मुंबईकडे निघाले आहेत. मात्र याचदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईला जात असताना एका मराठा आंदोलकाचा मृत्यू झाला आहे.
किल्ले शिवनेरीवर जरांगे पाटील गेले होते. दरम्यान, किल्ल्याच्या पायथ्याशी एका 45 वर्षीय मराठा बांधवांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितलं. सतिष देशमुख असं मृत व्यक्तीचं नाव आहे. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मृत व्यक्ती वरडगाव केज येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
जरांगे पाटील आज सकाळी किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यास गेले होते. तेथून निघतानाच पायथ्याशी एका आंदोलकाचा मृत्यू झाला. या आंदोकाला श्रद्धांजली वाहून आणि त्याच्या कुटुंबीयांचे सात्वन करून जरांगे पाटील आता मुंबईकडे रवाना झाले आहेत.
मृत्यूनंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रीया
सतीश देशमुखांच्या मृत्यूनंतर मनोज जरांगे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मला आता माहिती कळाली की आमचा देशमुख नावाचा बांधव प्रवासात असताना त्यांचा दम छाटला आणि त्यांना अटॅक आला. मी याबाबत अजूनही माहिती घेत आहे. परंतु ही घटना अत्यंत दुःखद आहे. याला जबाबदार फडणवीस साहेब आहेत. तुम्ही आता जर का आम्हाला आरक्षण दिले तर आमचे बळी जाणार नाहीत. आमचे आणखी दोन बळी घेतले आहेत. लातूरला परवाच्या दिवशी अशीच घटना घडली आहे. आज देखील अशीच घटना घडली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.