सौजन्य - नवराष्ट्र टीम
शिवनगर : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपत आला असून आता लवकरच निवडणूक होणार असून या निवडणूकीसाठी मोर्चेबांधणीला वेग येण्याची चिन्हे आहेत. सध्या या कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे वर्चस्व आहे. अजित पवार यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी काही दिवसांपूर्वी कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
युगेंद्र पवार यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी सांगितले की, कारखान्याची निवडणूक ही पक्ष म्हणून लढवली जात नाही. माळेगाव सहकारी साखर कारखाना हा शरद पवारांचा कारखाना म्हणून देशात, राज्यात ओळखला जातो. शरद पवार या कारखान्याचे सभासद आहेत. शरद पवार यांनी या कारखान्याच्या भल्यासाठी आजवर अनेक निर्णय घेतले आहेत. माळेगाव कारखाना आणि तेथील संस्था, तसेच बारामती येथील एमआयडीसी या शरद पवार यांच्या प्रयत्नांतून उभ्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे निवडणूक लढवायची का नाही शरद पवार याच्यावर चर्चा करणार आहेत. यामुळे लोकसभा, विधानसभा या निवडणुकीत पवार विरुध्द पवार अशी निवडणूक झाली त्या मुळे तालुक्यातील प्रत्येक निवडणुक ही अशीच लढणार आहेत का?, अशी तालुक्यात चर्चा सुरू आहे.
पवार विरुद्ध पवार लढत होण्याची चिन्हे
युगेंद्र पवार यांच्या भूमिकेमुळे माळेगाव कारखान्याची निवडणूक पवार विरुद्ध पवार अशी होणार असल्याचे चित्र आहे. त्यातच या कारखान्यातील तगडे विरोधक म्हणून ओळखले जाणारे कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांची भूमिका देखील महत्त्वाची ठरणार आहे. गेले दहा वर्षांपूर्वी चंद्रराव तावरे व रंजन तावरे या गुरु शिष्याच्या जोडीने अजित पवार यांच्या माळेगाव कारखान्यातील वर्चस्वाला छेद देऊन माळेगाव कारखाना आपल्या वर्चस्वाखाली घेतला होता. त्यावेळी थेट भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी ही निवडणूक झाली होती. सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीतील महत्त्वाचा घटक पक्ष म्हणून सत्तेत सहभागी आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे चंद्रराव तावरे व रंजन तावरे या दोघांना बरोबर घेणार का?, यासाठी त्यांची मनधरणी करून समझोता करणार का, हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक
दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक संपूर्ण राज्यात चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी सत्ताधारी गटामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार कोणाला संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून इच्छुकांची त्यासाठी मोर्चे बांधणी सुरू आहे.