पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाचे (Pune Loksabha Election) भाजपचे गिरीश बापट (Girish Bapat) आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे (Chandrapur Loksabha Election) काँग्रेसचे बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर या दोन्ही मतदारसंघाच्या जागा रिक्त आहेत. आता या दोन्ही जागांवर लोकसभा पोटनिवडणूक होण्याची शक्यता नाही, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
विद्यमान खासदाराच्या निधनानंतर पुढील निवडणुकीला एक वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ असेल तर निवडणुका घेणे निवडणूक आयोगाला अनिवार्य असते. मात्र, काही अपवादात्मक परिस्थितीचे कारण पुढे करून ही निवडणूक टाळली जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीची कुठलीही हालचाल नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या दोन्ही जागा येत्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत रिक्त राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गिरीश बापट यांचे 29 मार्च रोजी निधन तर बाळू धानोरकर यांचे 30 मे रोजी निधन झाले होते. 17 व्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपत आहे. मात्र, तरी पोटनिवडणुकीची शक्यता नाही. एक वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ शिल्लक असल्यास निवडणूक घेणे बंधनकारक असते.
नियम काय सांगतो ?
लोकप्रतिनिधीच्या निधनानंतर लोकसभेच्या कार्यकाळापेक्षा कमी कालावधी उरला असेल तर निवडणूक टाळता येते. 16 जून 2024 ला लोकसभेचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे या 16 जून 2023 नंतर या लोकप्रतिनिधींचे निधन झाले असते तर कार्यकाळाचे कारण देत या निवडणुका टाळता आल्या असत्या. मात्र, या दोन्ही जागा एक वर्षापेक्षा जास्त काळ आधीच रिक्त झाल्या आहेत. मात्र, तरीसुद्धा या दोन्ही जागांसाठी लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता नाही.