बारामती : आमच्या दहा वर्षांच्या कार्यकाळाचा हिशेब मागणाऱ्यांनी अगोदर त्यांच्या २०१४ ते २०२४ या काळातील राजवटीचा हिशेब द्यावा, असे आवाहन करीत या काळात कुणाचे राज्य होते? असा सवाल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. शेतमालाचे भाव पाडून इंधनाच्या किमती वाढवून इतर वस्तूंच्या किमती महाग करून एक प्रकारे शेतकऱ्यांची पाकीटमारी केली असल्याची टीकादेखील पवार यांनी यावेळी केली.
सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते कण्हेरी येथील मारुती मंदिरात नारळ वाढवून खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी कण्हेरी येथील ग्रामस्थ, पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
२०१४ ते २०२४ मधील राजवटीचा हिशेब द्यावा
यावेळी पवार म्हणाले, भाजपाला घटना बदलायची आहे म्हणून त्यांना जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आहेत, असे त्यांच्यातीलच एक मंत्री म्हणाले. आमच्या दहा वर्षांच्या कार्यकाळाचा हिशेब मागणाऱ्यांनी अगोदर त्यांच्या २०१४ ते २०२४ या काळातील राजवटीचा हिशेब द्यावा. या काळात कुणाचे राज्य होते असा सवालही त्यांनी विचारला.
आपल्याला वाद वाढवायचा नाही
सकाळी शरद पवार यांच्या सोबत हनुमान मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, “आपल्याला वाद वाढवायचा नाही, संघर्ष वाढवायचा नाही, काम करायचे आहे आणि तुतारी वाजवायची आहे. साहेबांनी ९० टक्के वेगवेगळ्या संस्था बारामती तालुक्यासह महाराष्ट्रामध्ये आणल्या आहेत.”
कमीत कमी दीड लाखाचा लीड मिळेल
आमदार रोहित पवार म्हणाले की, “कोणी कितीही काहीही म्हटले, तरी संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला माहिती आहे की, बारामती आणि महाराष्ट्राचा विकास कोणी केला, यंदा सुप्रिया सुळे यांना बारामती तालुक्यात कमीत कमी दीड लाखाचा लीड मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.” आमदार संजय जगताप यांनी यावेळी बोलताना बारामती पेक्षा पुरंदर तालुका ताईला जास्त लीड देईल असा विश्वास व्यक्त केला.
नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित
दरम्यान, सन १९६७ पासून प्रत्येक निवडणुकीत शरद पवार याच मंदिरातून नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करतात. याशिवाय वेळ मिळेल तसे आणि बारामतीत असल्यानंतर ते अनेकदा सहकुटुंब दर्शनालादेखील येतात. त्यानुसार आजही खासदार सुळे यांच्या प्रचाराचा नारळ येथेच फोडण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, सतीश खोमणे, आमदार संजय जगताप, श्रीनिवास पवार, आमदार रोहित पवार, शर्मिला पवार,सत्यव्रत काळे, जितेंद्र पवार, कविता मित्र, राजेंद्र पवार, बारामती तालुका अध्यक्ष एस एन जगताप, यांच्यासह पवार कुटुंबीय, अन्य पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आणि मोठ्या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
९६ वर्षांचे गुरुजी आणि साहेबांची ओळख
पवार साहेब भाषणाला उभे राहताच उपस्थित नागरिकांमधून एकच जयघोष झाला. ‘देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो म्हणत दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. श्रोत्यांमध्ये काही ज्येष्ठ नागरिक समोर बसले होते. त्यांपैकी एक गुरुजी असून ते सध्या ९६ वर्षाचे आहेत, त्या सर्वांना शरद पवार यांनी ओळखले. त्यांनी ओळख देताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली.