संग्रहित फोटो
पुणे : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून वारंवार रस्त्यावरील कारवाईपेक्षा वाहतूक नियमन करण्यावर भर देण्यास सांगितले आहे. मात्र, वाहतूक पोलिसांचा कोपरा कारवाईचा ‘मोह’ सुटत नसल्याचे दिसत आहे. नियमनासाठी नेमून दिलेल्या ठिकाणी न थांबता दुसऱ्याच ठिकाणी थांबवून घोळक्याने कारवाई केली जात असल्याचे समोर आल्यानंतर वाहतूक शाखेतील तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे थेट निलंबन केले. तिघेही खडक वाहतूक विभागातील असून, या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे वाहतूक विभागातील कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
हवालदार संतोष चंद्रकांत यादव, बालाजी विठ्ठल पवार आणि मोनिका प्रविण करंजकर अशी निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
पुणे शहरातील कोंडीने पुणेकर त्रस्त आहेत. कोंडी सोडविण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार व वाहतूक शाखेचे अधिकारी यांच्याकडून सातत्याने नवनवीन उपक्रम राबविली जात आहेत. रस्त्यावर उभा राहून कारवाई करण्यापेक्षा वाहतूक नियमन करण्यावर भर द्यावा, अशा स्पष्ट सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. मात्र, असे असले तरी काही कर्मचारी नेमून दिलेल्या ठिकाणांपेक्षा मोक्क्याच्या अन् कोपरा कारवाईवर भर देत असल्याचे दिसत आहे.
सहसा प्रत्येक कर्मचाऱ्याला हद्दीतील चौक आणि प्रमुख रस्त्यावर नेमून दिले जाते. संबंधित ठिकाणी सुरुळीत वाहतुकीसाठी वाहतूक नियमन ही कर्मचाऱ्याची जबाबदारी असते. मात्र, असे होताना दिसत नाही.
दरम्यान, १५ मे रोजी खडक वाहतूक विभागातील हवालदार यादव यांना एस.पी. चौक, पवार यांना हिराबाग चौक व करंजकर यांना भावे चौकात नेमले होते. मात्र, प्रत्यक्षात तिघांनीही हे ठिकाण सोडून पुरम चौकात एकत्र येत वाहनांवर कारवाई सुरू केली. नियुक्त केलेले तिघे नेमून दिलेले चौक सोडून दुसऱ्याच चौकात एकत्र येत वाहनांवर दंडात्मक कारवाई करत असल्याचे आढळले. त्यानंतर तिघांवर निलंबनाची कारवाई केली. वाहतूक विभागाचे (प्रभारी) उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.
अनेक चौकात हीच परिस्थिती
नेमून दिलेले चौक किंवा सिग्नलच्या चौकात कोंडी सोडविण्यासाठी उभा न राहता दुसऱ्याच ठिकाणी पोलीस उभा असल्याचे चित्र वारंवार पाहायला मिळते. चौक सोडून काही अंतरावर किंवा कोपऱ्यात राहून कारवाई केली जाते. शहरातील अनेक चौकात अशा पद्धतीने एकत्रितपणे घोळक्याने कारवाई केली जाते. त्यामुळे वाहतूक पोलीस विनाकारण सर्व सामान्यांच्या मनात संशय निर्माण करतात. त्यामुळे अशा कारवाया बंद करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. तरीही हे होताना दिसत आहे. यामुळे वरिष्ठांनी याप्रकरणात थेट निलंबनाची कारवाई केली.