पुण्यासह परिसराला मुसळधार पावसाने झोडपले; हवामान विभागाने म्हटलं, 'पुढील सहा दिवस...'
पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. कधी उन्हाचा तीव्र कडाका तर कधी अवकाळी पाऊस अशीच स्थिती निर्माण होताना दिसत आहे. राज्यातील बहुतांश शहरांच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हाचे चटके बसत असतानाच आता पुढील सात दिवस राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती, संपूर्ण कोकण, खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, नांदेड, या जिल्ह्यांत 3 ते 10 मेपर्यंतच्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहील. काही ठिकाणी एखाद-दुसऱ्या दिवशी विजांचा गडगडाट, वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या वातावरणाचा प्रभाव विदर्भातील जिल्ह्यांत जाणवू शकतो. तसेच, गारपिटीचीही शक्यता आहे. मुंबईत सकाळी आकाश ढगाळ असेल, तर दुपारी निरभ्र राहील.
तापमानात दोन अंशांनी येणार घट
महाराष्ट्रात कमाल तापमान 38 अंशांपर्यंत असून, काही ठिकाणी तर 40 अंश सेल्सिअसपर्यंत आहे. शनिवारपासूनच्या आठवड्यात तापमान दोन अंश सेल्सिअसने खालावण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रात रात्रीचा उकाडा वा कुठेही उष्णतेच्या लाटेची शक्यता नाही. ईशान्य राजस्थानात समुद्र सपाटीपासून 1.5 ते 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे.
उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचा धोका
सध्या वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यातच यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेचा धोका लक्षात घेता, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्रासह 11 राज्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल, बेघर, वृद्ध, लहान मुले आणि उघड्यावर काम करणाऱ्या कामगारांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.