संग्रहित फोटो
पुणे : पुणे शहरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी पुणे पोलीस वेगवेगळ्या उपाययोजना करत असताना बेशिस्त वाहन चालकामुळे मात्र नियमांची ऐशी-तैशी होत आहे. वाहने कशीही दामटून बेशिस्त वाहन चालक अपघाताला नियत्रंण व वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. पोलिसांनी कारवाई वाढवली तरी बेशिस्तांची संख्या कमी होत नसल्याचे वास्तव आहे. परंतु, बेशिस्तांना शिस्तीत आणण्यासाठी पोलिसांकडून ट्रिपलशीट, विरूद्ध दिशेने वाहने चालविणाऱ्या तसेच मद्यपान करून वाहन चालविणे आणि रॅश ड्रायव्हिंग यांच्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. विशेष मोहिम राबविल्या जात आहेत. गेल्या चार महिन्यात (जानेवारी ते २८ एप्रिल २०२५) या कालावधीत तब्बल पावणे दोन लाख वाहन चालकांवर कारवाई केली आहे. कारवाईत सातत्य ठेवून पुढील काळात कठोर पावले उचलली जातील असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
वाहतूक कोंडीत पुण्याचा जगात चौथा क्रमांक असल्याचे ‘टॉमटॉम’च्या सर्व्हेत दाखविण्यात आले. वाहतूक पोलिसांनी युद्ध पातळीवर उपाययोजना राबवत वाहतूक कोंडीवर वेगवेगळ्या उपाययोजना करण्यास सुरूवात केली. पहिल्या टप्यात १५ रस्त्यांवरील वाहतूक कमी करण्यासाठी उपाय योजले. काहीच दिवसात पोलिसांच्या या उपाययोजनांना यश आले. वाहतूकीचा वेग वाढल्याचा दावा पोलिसांनी केला. परंतु, तरीही शहरातील वाहतुकीचा प्रश्न भीषण बनत चाललेला आहे. हे होत असतानाच पोलिसांनी बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
बेशिस्तपणामुळे वाहन चालक स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात घालत असल्याने अशांवर दंडात्मक कारवाईत वाढ केली. कारवाईत सातत्य ठेवण्यास विशेष लक्ष देण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षात एकेरी वाहतुकीच्या रस्त्यावर विरुद्ध दिशेने (राँग साईड) येणाऱ्या तब्बल १ लाख ७८ हजार वाहनांवर कारवाई केली. तर, चालू वर्षात पहिल्या चार महिन्यातच १ लाख ६७ हजार वाहनांवर कारवाई केली आहे. पोलिसांच्या पहिल्या चार महिन्यात केलेल्या कारवाईतून बेशिस्तांची संख्या दिसून येते. यामुळे अपघाताला निमत्रंण तर मिळत आहेच, पण वाहतूक कोंडीला देखील हे वाहन चालक कारणीभूत ठरत असल्याचे दिसते.
कारवाईत वाढ
वाहतूक पोलसांनी रस्त्यावर विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, दुचाकीवर दोनहून अधिक जणांनी प्रवास करणे, मद्यपान करून वाहन चालविणे, बेदरकार वाहतूक आणि अवजड वाहतुकीवर निर्बंध आदी गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले आहे. २०२१ ते २०२३ या कालावधीत दर वर्षी अनुक्रमे ३१ हजार ५९१, २२ हजार ९६९ आणि २१ हजार १२४ वाहनांवर कारवाई झाली होती. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई होऊनही बेशिस्त वाहनचालक सुधारणार का असा प्रश्न आहे.
अपघात अन् वाहतुकीला अडथळा
शहरात बेशिस्त वाहन चालकांमुळे अपघात झाल्याच्या घटना घडल्याचे दिसून येत आहे. कर्वे रस्ता, शिवाजी रस्त्यावर अपघात झाले. त्यामुळे याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोबतच जड वाहनांना शहरातील काही रस्त्यांवर दिवसा प्रवेशबंदी केली आहे. पण, जड वाहने भरधाव धावत असल्याचे वेळोवेळी दिसत आहे. त्यामुळे पोलिसांकडून देखील फक्त दंडात्मक कारवाई न करता यावर कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
वाहतूक पोलिसांना वॉर्डनची साथ
पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. महापालिकेकडून पोलिसांना मदतीसाठी वॉर्डन नेमून दिले आहेत. या वॉर्डनकडून चौका-चौकात वाहतूक नियमन होत असल्याचे पाहायला मिळते. पण, वाहतूक पोलीस मात्र, कुठे आणि कधी तरीच वाहतूक नियमन करताना दिसून येतो. बहुतांश वेळा वाहतूक पोलीस चौकाच्यापुढे दंडात्मक कारवाईसाठी उभे असल्याचे दिसून आलेले आहे.
गेल्या वर्षात वाहतूक पोलिसांनी पहिल्या चार महिन्यात म्हणजे, जानेवारी ते एप्रिल २०२४ या कालावधीत दहा हेड खाली बेशिस्तपणे गाडी चालविणाऱ्या ७५ हजार ७१३ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली होती. तीच यंदा पहिल्या चार महिन्यात तब्बल ३ लाख २२ हजार ०१६ इतक्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यावरून वाहतूक पोलिसांच्या कारवाईची झालेली वाढ लक्षात येईल. ही फक्त बेशिस्तपणे तसेच, अपघाताला निमत्रंण किंवा वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या नियमांबाबतची कारवाई मानली जाते.
गेल्या वर्षातील एकूण कारवाई
गेल्या वर्षी वाहतूक पोलिसांनी ४ लाख ५१ हजार ३३८ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करून ३० कोटी १७ लाख ६३ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. तर, ६ लाख १२ हजार १३८ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली असून, त्याचा ५९ कोटी ७३ लाख ४० हजार १५० रुपये दंड हा पेंडीग आहे.