भाईंदर : मिरा-भाईंदरमधील महाजनवाडी परिसरात जाहिरात फलक स्पष्ट दिसण्यासाठी पेल्टोफोरम प्रजातीच्या एका सुदृढ झाडावर विषारी रसायन टाकून झाड मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पर्यावरणप्रेमींनी याविरोधात आवाज उठवल्यानंतर महापालिकेच्या वन विभागाने घटनास्थळी पाहणी करून ही बाब स्पष्ट केली. या प्रकरणी ‘एंगेज आउटडोर मिडिया’ या जाहिरात कंपनीविरोधात काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना मिरा रोड येथील महाजनवाडी परिसरातील लता मंगेशकर नाट्यगृहासमोरील स्टार गेस्ट हाऊसजवळ घडली. राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या एका मोठ्या जाहिरात फलकाच्या दृष्टीआड येणारे झाड एका ठेकेदाराने हेतुपुरस्सर सुकवले. महापालिकेतील प्रमुख माळी दत्तात्रय गभाले यांच्या लेखी तक्रारीनुसार, संबंधित झाडात मशीन किंवा इतर हत्याराने छिद्र पाडून त्यात रासायनिक द्रव्य टाकण्यात आले. यामुळे झाड सुकले आणि फलक पूर्णपणे दिसू लागला.
पर्यावरणप्रेमी संस्थेच्या तक्रारीनंतर महापालिकेच्या वन विभागाने २९ मे २०२५ रोजी पंचनामा करून घटनास्थळी तपास केला. तपासात झाडात विषारी रसायन टाकल्याचा स्पष्ट पुरावा सापडला. यानंतर महापालिकेने जाहिरात कंपनीला नोटीस बजावली होती. कंपनीने खुलाशात आपला दोष नाकारला, मात्र झाड त्यांच्या फलकाजवळच असल्याने आणि कोणताही इतर हेतू दिसून न आल्याने, ही कृती त्यांनीच केली असावी, असा ठाम निष्कर्ष महापालिकेने नोंदवला.
या घटनेमुळे पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप पसरला आहे. ‘फॉर फ्यूचर इंडिया’ या पर्यावरणसंस्थेचे अध्यक्ष हर्षद ढगे यांनी म्हटले, “हे केवळ एका झाडाची हत्या नाही, तर निसर्गावर, कायद्यावर आणि लोकशाही व्यवस्थेवर केलेला आघात आहे. कोणतीही जाहिरात निसर्गाची हत्या करून फळत नाही.” त्यांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आणि याविरोधातील लढा सुरूच ठेवण्याचा इशारा दिला.
महापालिकेच्या वन विभागाच्या शिफारशीनंतर काशिमिरा पोलीस ठाण्यात ‘एंगेज आउटडोर मिडिया’ या जाहिरात कंपनीविरोधात महाराष्ट्र नागरी क्षेत्रे झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ चे कलम २१(१), वृक्ष संरक्षण व संवर्धन नियम, २००९ तसेच शासनाच्या अधिसूचना व आदेशांचे उल्लंघन या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या घटनेमुळे शहरातील अनेक पर्यावरणप्रेमींनी अशी कृती ही माणुसकीला काळिमा फासणारी असून, निसर्ग संरक्षणासाठी अधिक कठोर कायदे आणि अंमलबजावणीची गरज असल्याचे मत मांडले आहे. झाडांवरून जाहिरात फलक स्पष्ट दिसावा यासाठी त्यांना मारणे ही विकृती रोखण्यासाठी सामाजिक जागृती आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी हाच उपाय असल्याचे ते सांगत आहेत. ही घटना निसर्ग संरक्षणासाठी एक इशारा आहे – प्रशासन, नागरिक आणि पर्यावरण संस्था यांनी यापुढे एकत्र येऊन अशा प्रकारांना वेळीच रोखणे ही काळाची गरज बनली आहे.