बिहारमध्ये लवकरच होणार विधानसभा निवडणूक (फोटो- सोशल मीडिया)
वर्षा अखेरीस बिहारमध्ये निवडणूक होणार
निवडणूक आयोग लवकरच तरखांची घोषणा करणार
बिहारच्या मतदार यादीवरून राजकारण पेटले
Election Commision On Bihar Assembly Election 2025: लवकरच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोग लवरकच बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखांची घोषणा करू शकतो. त्यामुळे आता सर्व राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोग 30 सप्टेंबर ‘एसआयआर’नंतर अंतिम मतदार यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. ही अंतिम मतदार यादी असणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोग विधानसभेच्या तारखांची घोषणा करू शकतो. तसेच बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल दिवाळीनंतर लागण्याचा अंदाज आहे.
बिहारची विधानसभा निवडणूक ही यंदा केवळ 2 टप्प्यात होण्याची शक्यता आहे. कदाचित तीन टप्प्यात मतदान होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे 20 नोव्हेंबरनंतर निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. बिहार विधानसभेचा कार्यकाळ 22 नोव्हेंबर 2025 ला संपणार आहे. 22 तारखेनंतर बिहार विधानसभा भंग होईल. 22 तारखेच्या आधी नवीन विधानसभा गठित न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल.
BJP-JDU मुळे चिराग पासवानांना फटका
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएमध्ये जागावाटप जवळजवळ निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप आणि जेडीयूमध्ये जागांवर समन्वय झाला असून दोन्ही पक्ष समान जागांवर निवडणूक लढवू शकतात, अशी माहिती समोर आली आहे. तर चिराग पासवान यांच्या एलजेपी पक्षाने ४० जागांची मागणी केली आहे. ६-७ विधानसभा जागा एचएएम पक्ष आणि उपेंद्र कुशवाह यांच्या पक्षाच्या खात्यात जाऊ शकतात. असेही सांगितले जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेडीयू आणि भाजप १०० ते १०५ जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूने ११५ जागांवर आणि भाजपने ११० जागांवर तर त्यावेळी एनडीएचा भाग असलेल्या व्हीआयपीने ११ आणि एचएएमने ७ जागा लढवल्या होत्या. तर एनडीएसोबत नसलेल्या एलजेपी पक्षाने १३५ जागांवर निवडणूक लढवली होती. पण १३५ पैकी त्यांना फक्त एकच जागा जिंकता आली. भाजपने ७४ जागा जिंकल्या, तर जेडीयूने ४३ जागांवर विजय मिळवला. पण यावेळी जेडीयू १०० पेक्षा कमी जागांवर सहमत होणार नसल्याचे सांगितले जात आहे.
दुसरीकडे चिराग पासवान यांचा पक्ष लोक जनशक्ती पार्टी ४० जागांची मागणी करत आहे. पण त्यांना फक्त २० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर उरलेल्या जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चा आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चा या पक्षांना दिल्या जाऊ शकतात. जर मुकेश साहनी यांचा पक्ष व्हीआयपी, जो सध्या आरजेडी-काँग्रेस महाआघाडीचा भाग असलेल्या मुकेश साहनी यांच्या व्हीआयपी पक्ष आाघाडीतून बाहेर पडला तर समीकरणे बदलू शकतात.