PDP Chief Mehbooba Mufti (Photo Credit - X)
Mehbooba Mufti on Central Govt: पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी जम्मूतील पूरस्थितीवर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. दिल्लीतील सरकारने आमचे डोंगर, जंगले, नद्या आणि नाले अगदी कवडीमोल दराने कंत्राटदारांना विकले आहेत, असा आरोप त्यांनी केला. वैष्णोदेवी आणि इतर धार्मिक स्थळांचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, “ही मंदिरे केवळ पूजेसाठी आहेत. अशा ठिकाणी जाण्यासाठी तीन-चार महिन्यांचे नियोजन केले जाते, पण तुम्ही त्यांना पिकनिक स्पॉट बनवले आहे.”
मेहबूबा मुफ्तींनी आज बांधले गेलेले पूल तुटल्याबद्दल चिंता व्यक्त केली, तर ५०-६० वर्षांपूर्वीचे पूल आजही मजबूतपणे उभे असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. सिमेंटऐवजी केवळ वाळूचा वापर केला गेला का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. २०१४ मध्येही अशीच नैसर्गिक आपत्ती आली होती, याची आठवण त्यांनी करून दिली.
#WATCH | Jammu, J&K | PDP Chief Mehbooba Mufti says, “… Our government has handed over land, forest, and rivers to contractors on menial rates and left it up to them how they want to use it… The Amritsar-Katra six-lane highway is being built. Do these people not understand… pic.twitter.com/BXrOncAGDr
— ANI (@ANI) September 4, 2025
ज्या घरांमध्ये पाणी शिरून साचले आहे, त्यांना ‘अंशतः खराब’ न मानता ‘पूर्णतः खराब’ मानून पूर्ण नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली. ‘घरात पाणी साचले की ते धोकादायक बनते, भलेही भिंती उभ्या असल्या तरी’ असे त्या म्हणाल्या.
गुरुवारी (४ सप्टेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत पीडीपी अध्यक्षा म्हणाल्या की, ज्यांची घरे नाल्यांच्या बाजूला आहेत, त्यांना दुसरीकडे जागा द्यावी. जर हे शक्य नसेल, तर नाल्यांच्या सुरक्षिततेसाठी काही उपाययोजना करा. “हे येथील भाजप आमदार, केंद्र सरकार आणि स्थानिक सरकारसाठी आव्हान आहे. आज भारत सरकारने मोठे मदत पॅकेज जाहीर करायला हवे.” असे आवाहन त्यांनी केले.
मुफ्तींनी पूरग्रस्त भागात मेडिकल टीम्स पाठवण्याची मागणी केली. घरांमध्ये साचलेल्या चिखलामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले. ज्यांची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत, त्यांना सरकारने राहण्यासाठी जागाही दिली नाही, असा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आणि अनेक वाहने ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. ज्यांनी कर्ज घेतले आहे, त्याकडे सरकारने लक्ष द्यावे आणि पुढील दोन-तीन महिने बँकांनी त्यांच्या दारांवरून जाणे बंद करावे, यासाठी काहीतरी मार्ग काढला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.