दोन वर्षांच्या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला (फोटो- istockphoto)
जळगाव: जळगावमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. गावात शिरलेल्या बिबट्याने एका चिमुकलीवर हल्ला केला आहे. यामध्ये त्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला आहे. ही घटना जळगावमधील यावळ तालुक्यात घडली आहे. यावल तालुक्यातील डांभुर्णी शिवारात बिबट्याने दोन वर्षीय बालिकेवर हल्ला करून फस्त केले. गेल्या दिड महिन्यातील ही दुसरी घटना आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वनविभागाने बिबट्याचा त्वरित पिंजरे लावून बंदोबस्त करावा. तसेच बिबट पकडण्यासाठी विशेष प्रशिक्षीत पथकाची नेमणुक करावी अशा सूचना आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी केल्या आहेत. आमदार सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
त्यांनी या घटनेनंतर त्वरित जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदर घटनेबाबत माहिती दिली. याप्रसंगी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील, यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, वनपाल विपुल पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी तसेच नागरिक उपस्थित होते. यावेळी सदर मयताच्या कुटुंबीयांना भरीव मदत उपलब्ध करून देऊ असे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी सांगितले, तर वनविभागाने त्वरित याचा प्रस्ताव तयार करावा अशा सूचना दिल्या.
कराडच्या कांबिरवाडीत बिबट्याचा धुमाकूळ
कांबिरवाडी (मसूर, ता.कराड) परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालावयास सुरुवात केली आहे. बिबट्याने मोठी दहशत निर्माण केली. गावानजीकच्या शिवारात बिबट्याने दोन शेळ्या फस्त केल्याने ग्रामस्थांत घबराट पसरली आहे. वनविभागाने तातडीने पावले उचलत बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कांबीरवाडी नजीकच्या शिवारात दोन दिवसांपूर्वी जयहिंद म्हाकू पडळकर यांची बिबट्याने शेळी ठार केली. गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास युवराज परदेशी यांच्या पत्नी मळवी नावाच्या शिवारात शेळ्या चरावयास गेल्या होत्या. त्यांच्या डोळ्यादेखत बिबट्याने एका शेळीवर झडप टाकून ती ठार केली. बिबट्याने हल्ला केलेला पाहताच त्या ओरडल्या. त्यांच्या ओरडण्याने ग्रामस्थ जमा झाले. तोपर्यंत बिबट्याने धूम ठोकली.
कराडच्या कांबिरवाडीत बिबट्याचा धुमाकूळ; दोन शेळ्या केल्या फस्त
मसूर परिसरात आधी नव्हता बिबट्याचा वावर
मसूर परिसरात या अगोदर बिबट्याचा वावर नव्हता. आता भक्षाच्या शोधार्थ बिबट्याने या परिसरात पाऊल टाकले आहे. उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्या उसात लपण्याची शक्यता आहे. अशी भीती लोकांच्यामध्ये आहे. परिसरात ऊसतोड सुरू आहे. लोकांसह ऊस तोडणी कामगार शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत. वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू
यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील चितळी गावात मयूर दत्तात्रय वाघ यांची वस्ती गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकडी रोड काकडाई मंदिराजवळ आहे. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास अंगणात खेळत असलेला प्रथमेश मयूर वाघ या बालकावर घराशेजारी असलेल्या डाळींबाच्या बागेतून दबा धरून बसलेल्या बिबट्याने झेप घेत क्षणार्धात त्या साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याला घेऊन धूम ठोकली.