राज्यात अवकाळीचे तैमान (फोटो- istockphoto)
बुलडाणा : विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने थैमान घातले असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. एकीकडे शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना, अवकाळीमुळे बळी गेल्याचीही घटना सोमवारी घडली. सोमवारी लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यात वीज कोसळण्याच्या घटना घडली. या दोन्ही घटनांमध्ये नऊ जण जखमी झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे.
बुलढाण्यातील रंजना संदीप चव्हाण (वय ३५) यांचा वीज कोसळल्यामुळे मृत्यू झाला. तर सहा शेतमजूर महिला जखमी झाल्या आहेत. लातूरच्या घटनेत गोविंद एकनाथ भुरे (वय ५५,) अनुसया सिद्राम माने (वय ६०), प्रांजली गुरुनाथ कांबळे (वय ११) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर येणेगूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून उमरगा येथे पुढील उपचारांसाठी पाठवण्यात आले आहे. यातील गोविंद भुरे हे गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यात पाच-सहा दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. सोमवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तर पुढील चार दिवस पावसाचे असल्याने फळबाग उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
इंदूर-पुणे मार्गावरील वाहतूक खोळंबली
मनमाड शहर व परिसरात विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे इंदूर-पुणे महामार्गावरील मनमाड बसस्थानकाच्या परिसरात विद्युत तारा व एक झाड पडल्याने या महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान, पुणे, नाशिक, जालना जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात ओढ्यांना पूर आल्याचे चित्र दिसून आले.
येडशी, येरमाळा भागामध्ये जोरदार अवकाळी पाऊस
लातूर जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील येणेगूर परिसरात सोमवारी आठवडी बाजारादिवशी विद्युत खांबावर वीज पडल्याने वीज वाहक तार तुटून आठवडी बाजारात आलेल्यावर पडले. त्या तिघे जखमी झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यामध्ये दुपारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील येडशी, येरमाळा, भूम आणि धाराशिव परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह अवकाळी झाला.
उष्णता कमी पण शेतकऱ्यांचे नुकसान
अवकाळी पावसामुळे उष्णता कमी झाली असली तरी शेतकऱ्यांच्या आंबा, डाळिंब आणि इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात देखील सलग सहाव्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. यातच सोमवारी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे.
मुंबईतील काही ठिकाणी पाऊस
मंगळवारी सकाळी मुंबईतील काही भागांत पाऊस होताना दिसत आहे. कुर्ला, घाटकोपर या भागांमध्ये पाऊस होत आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहे.