वसई : डंम्पींग ग्राऊंड आणि एसटीपीच्या आरक्षीत जागेवर ४१ अनधिकृत इमारती उभारल्या प्रकरणी बहुजन विकास आघाडीच्या माजी नगरसेवकाला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वसई पूर्वेकडील वसंत नगरीतील सर्व्हे क्रमांक २२ ते ३० ही जमीन डंपिंग ग्राऊंड आणि एसटीपी प्लॉटसाठी आरक्षित ठेवण्यात आली होती. २००८ मध्ये बहुजन विकास आघाडीचे तत्कालीन नगरसेवक सीताराम गुप्ता यांनी या जागेचा ताबा घेऊन काही बिल्डरांना ती विकली होती. त्यानंतर मनपा अधिकाऱ्यांच्या संगनमताने या जागेवर चार मजल्यांच्या ४१ अनधिकृत इमारती उभारण्यात आल्या आहेत.
डी चे तत्कालीन साहाय्यक आयुक्त रतेश किणी यांनी या ४१ इमारतींना नोटीसा बजावून त्या रिकाम्या करण्याचे आदेश दिले होते. तर काही महिन्यांपूर्वी या २० एकर जमीनीवर कब्जा करून बनावट कागदपत्रांद्वारे त्या विकण्यात आल्या प्रकरणी आचोळे पोलिसांनी सीताराम गुप्ता, त्याचा पुतण्या अरुण गुप्ता आणि राजू सिंग यांच्या विरोधात वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले होते. तेव्हापासून सीताराम गुप्ता फरार होता. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंबईतून त्याला अखेर अटक केली आहे.
सर्व्हे नंबर २२, २३, २६, २७, २८, २९, ३० वसंत नगरी, मौजे आचोळे येथील २० एकर जमीनीवर कब्जा करून सिताराम गुप्ताने बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करून ७० करोड रुपयांची पीयूष पटेल व त्यांच्या परिवाराची फसवणूक केली होती. या जमिनीवर अरुण गुप्ता व राजू सिंग यांनी बांधलेल्या बिल्डींगमधील फ्लॅटला घरपट्टी लावण्यासाठी पीयूष यांच्या मालकीचे खोटे सर्व्हे नंबर आणि हिस्सा नंबर जोडून खोटे प्रतिज्ञापत्र ही पालिकेत सादर केले होते. डंपिंग आणि एसटीपी आरक्षणामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. २०२१ मध्ये कोकण आयुक्त आणि पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी या इमारती रिकाम्या करण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. तर पोलिसांनी याप्रकरणी त्याचा पुतण्या अरुण गुप्ता याला अगोदरच अटक केली. मंगळवारी सीताराम गुप्ता याला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. सिताराम गुप्तावर यापुर्वीही गंभीर स्वरुपाचे अनेक गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर केल्यावर १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.