दिवसेंदिवस राज्यातील तापमान वाढत जात असून उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अशातच आता कोकणातील काही भागांमध्ये पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कुडाळ तालुक्यात घोटगे-मळेवाड गावातील नागरिक दररोज पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करत असल्याचं दिसून येत आहे. गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी खालावत जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
कोकणात सर्वाधिक पाऊस पडत असला तरीही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांमध्ये भीषण पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतोय. कुडाळ तालुक्यातील घोटगे गावातील मळेवाड येथे पाणीप्रश्न गेले अनेक दशकापासून कायम आहे. या गावांमध्ये पाणी टंचाई असताना पाटबंधारे विभागाचा कोणताही प्रकल्प नाही. त्यामुळे येथील नागरिकांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागतेय. पाऊस गेल्यानंतर पुढच्या काही महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई भासतेय. या गावातील अनेक विहिरींची पाणी पातळी घटली आहे. त्यामुळे गढूळ पाण्याचा नागरिकांना वापर करावा लागतोय. पाणी टंचाई असल्याने मे महिन्यात चाकरमानी देखील गावी येण्यास टाळाटाळ करतात. मात्र, हे गाव पाणीटंचाई मुक्त होण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन उपाययोजना करण्याची मागणी इथल्या गावच्या सरपंच श्रुती घाडीगांवकर यांनी केलीय.
एकीकडे पाणी टंचाईने नागरिक हैराण आहेत तर दुसरीकडे कर्जत तालुक्यात चक्क दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.कर्जत तालुक्यात दिवसेंदिवस पाणीप्रश्न पेटत आहे .त्यात आता भरीला भर म्हणून मुद्दाम ठाकूरवाडीला दूषित पाणी देण्याचा कट आहे का ? असा सवालगावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. पळसधरीमधील अंदाजे १४० घरं असणारी ठाकूरवाडी गावाला पळसदारी धरणालगत असलेल्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो.
गावामध्ये जलजीवन मिशनचं काम सुरु आहे पण पाण्याचा मुख्य स्रोत नसल्यानं पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. पळसधरीमधल्या ठाकूरवाडीला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरच ठेकेदारांचा डोळा होता .. पाईपलाईन टेस्ट करण्यासाठी ठेकेदाराने थेट विहिरीत पाणसोडलं आणि संपूर्ण विहीर दूषित करून टाकली. डॅम जवळ असणाऱ्या एका दूषित डोहातून हे पाणी थेट विहिरीत आल्यानं संपूर्ण पाणी खराब झालं.वर्षानुवर्षे अनेक सुविधांपासून वंचित राहूनही एक शब्द न काढणारा ठाकूर आणि आदिवासी समाज आता आपलं पाणी सुद्धा हिरावून घेतलं म्हणून प्रचंड आक्रमक झाला. ठाकुरवस्तीमधले शेकडो ग्रामस्थ ह्यांनी विहिरीला घेराव घातला आणि आमच्या जीवाशी खेळ चालू असल्याची व्यथा मांडली आहे.
मुळात हि विहीर फक्त पळसधरी ठाकूरवाडीसाठी असताना ते पाणी इतरांना देऊन आता विहिरीवर सुद्धा राजकारण सुरु झालं आहे .विहीर दूषित झाल्यामुळे काही दिवस आता ह्या ठाकूरवाडी मधल्या बांधवाना पाणी मिळणार कि नाही ह्यावरही प्रश्नचिन्ह आहे.जलजीवन मिशनच्या ठेकेदाराने अनेक उलट सुलट काम करून ग्रामस्थांना विश्वासात न घेता थुकपट्टी लावल्याचंही चित्र दिसतंय .काही वर्षांपूर्वी उन्हाळ्यात पाणी आणताना ऍक्सीडेन्ट मध्ये एका मुलीचा मृत्यू झाला. त्यामुळे पळसधरी ठाकूरवाडीच्या माथ्यावर कायमच पाण्याचा संघर्ष लिहिलाय कि काय असा प्रश्न उपस्थित होतोय.पाणी दूषित झालेलं पाहून मात्र ठाकूरवाडीतल्या ग्रामस्थांनी एकजूट केली आणि आमच्या जीवावर उठलेल्या ठेकेदारांना आम्ही जशाच तसं उत्तर देऊ अशी ठाम भूमिका मांडली . गावातील पोलीस पाटील विनया खोपकर ह्यांनी ग्रामस्थांची बाजू उचलून धरत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितलं आहे.