संग्रहित फोटो
पुणे : पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे येथील ग्रामसभेत दिवाळी पाडव्याच्या दिवशी गावकऱ्यांनी एकमुखाने ठराव मंजूर करत प्रस्तावित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला ठाम विरोध दर्शविला. “एकाही शेतकऱ्याची जमीन जाणार नाही आणि गावातील एकाही नागरिकाला अन्याय सहन करावा लागणार नाही,” असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.
गेल्या काही वर्षांपासून पुरंदर विमानतळ प्रकल्पाविषयी परिसरात मतभेद आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. काहीजण विमानतळाच्या बाजूने तर काही विरोधाच्या भूमिकेत होते. मात्र, यावर्षीच्या दिवाळी पाडव्याच्या ग्रामसभेने हे मतभेद बाजूला ठेवत ऐक्याचा सूर लावला. सभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शेतकरी, महिला आणि युवक उपस्थित होते.
गावातील कोणताही नागरिक स्वतंत्रपणे शासनाशी चर्चा करणार नाही. सर्व संवाद, निवेदन आणि निर्णय ग्रामपातळीवरील कृती समितीमार्फतच होतील. या समितीचे गठन पुढील काही दिवसांत करण्यात येईल, असेही यावेळी ठरवण्यात आले.
“आमच्या जमिनींचा सौदा मान्य नाही”
सभेत बोलताना ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक शेतकरी नेत्यांनी सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली. “विकासाच्या नावाखाली आमच्या शेतीवर गदा येणार असेल, तर तो विकास आमच्यासाठी विनाशकारी ठरेल,” असे मत एका ज्येष्ठ शेतकऱ्याने मांडले.
काही युवकांनी पुनर्वसन, रोजगार आणि पर्यायी उपजीविकेच्या संधी याविषयी प्रश्न उपस्थित केले. या सर्व मुद्द्यांवर अभ्यासगट नेमून शासनाला सविस्तर अहवाल सादर करण्याचे ठरले.






