File Photo : Eknath Shinde
भाजपाने आज देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी नेमणूक करत तेच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट केले आहे. त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेत सत्तास्थापनेसाठी दावाही केला आहे. उद्या आझाद मैदानावर शपथविधी होणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. मात्र एकनाथ शिंदे अजूनही नाराज असल्याच्या चर्चा आहे. त्यांना गृहमंत्रीपद शिवसेनेकडे हवे आहे असे बोलले जात आहे. त्यामुळे आज याबद्दल तोडगा काढावा लागणार आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते, माजी खासदार विनायक राऊत यांनी महायुतीत एकनाथ शिंदे यांची गरज आता संपली आहे असे वक्तव्य केले आहे.
विनायक राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले की, मतमोजणी होऊन दहा ते बारा दिवसांनी महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळतोय हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.बहुमत मिळून सुद्धा तेरा दिवस उलटून महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळू शकला नाही याच्या मागचं कारण भाजप आणि गद्दार गटांना स्पष्ट करणं आवश्यक एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला आता काडीची देखील किंमत नाही, गरज असेल तर या नाहीतर चालते व्हा अशी सांगायची ताकद भाजपने ठेवली आहे. उद्याच्या शपथविधी मध्ये एकनाथ शिंदे यांच्या विचाराला कुठेही किंमत दिलेली नाही, तुम्हाला गरज असेल तर आमच्या मंत्रिमंडळात या नाही तर आमच्या सोबत अजित पवार आहेत.
एकनाथ शिंदे यांची गरज आता संपली आहे
ते पुढे म्हणाले की, अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी शिंदे गटाची विकेट कधीच पाडली आहे. एकनाथ शिंदे यांची गरज आता संपली आहे, भाजपने शिंदेंच्या माध्यमातून शिवसेना फोडण्याचे पाप केले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जरी तांत्रिक बाब असेल तर मग शपथ का घेत आहात ?, शपथ घेण्याच्या कार्यक्रमावर करोडो रुपये का खर्च केला जातोय ?, पंतप्रधानांपासून सर्व मुख्यमंत्र्यांना मुंबईत का बोलावलं जातं आहे ?तुम्ही महाराष्ट्राची फसवणूक केली ती आता बस झाली, आता जे काही दिवे लावायचे ते लावा. अशी टीकाही त्यांनी महायुतीवर यावेळी केली.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ईव्हीएमचा घोटाळा झाला आहे, हा मेरिटवर मिळवलेला विजय नाही. पुन्हा एकदा उभे राहू आणि आमचा भगवा झेंडा फडकवून दाखवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीने 7 जागा जिंकल्या असून केवळ एक जागेवर ठाकरे गटाचा विजय झाला आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला असणारा कोकणात आता पुन्हा विजय मिळवण्याचे आव्हान आहे.