आषाढी वारी 2026 (फोटो- सोशल मीडिया)
लाखो वारकऱ्यांमुळे शहरातील प्रमुख बाजारपेठा गजबजल्या
वारकऱ्यांनी लुटला खरेदीचा आनंद
शनिवारवाड्याच्या तटबंदी परिसरात वारकऱ्यांची मोठी गर्दी
पुणे/गायत्री पावळे: आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी पुण्यात दाखल झालेल्या लाखो वारकऱ्यांमुळे पुणे शहरातील प्रमुख बाजारपेठा आणि पर्यटनस्थळे गजबजून गेली होती शनिवारवाडा, लालमहाल परिसर, लक्ष्मी रोड, तुळशीबाग, कसबा पेठ, मंडई तसेच शनिवार पेठ परिसरात दिवसभर वारकऱ्यांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली. शहरातील ऐतिहासिक वास्तू आणि धार्मिक स्थळांना भेट देतानाच अनेक वारकऱ्यांनी खरेदीचाही आनंद लुटला.
शनिवारवाड्याच्या तटबंदी परिसरात वारकऱ्यांची मोठी गर्दी दिसून आली. अनेक जण ऐतिहासिक वास्तूंची माहिती घेत छायाचित्रे टिपताना दिसले. काही वारकरी कुटुंबीयांसह पुण्याची ऐतिहासिक ओळख अनुभवण्यासाठी येथे थांबले होते. तटबंदीलगत उभारण्यात आलेल्या विविध विक्रेत्यांच्या स्टॉलवर धार्मिक साहित्य, टाळ, चिपळ्या, तुळशीमाळा, विठ्ठल-रुक्मिणींची चित्रे, भगवे ध्वज, कपडे आणि दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणावर झाली.
लक्ष्मी रोड, तुळशीबाग आणि मंडई परिसरातही वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने खरेदी केली. महिलांनी साड्या, पूजेचे साहित्य, बांगड्या आणि घरगुती वस्तू घेतल्या, तर पुरुषांनी पारंपरिक पोशाख, टोपी आणि धार्मिक साहित्य खरेदी केले. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक दुकानांमध्ये ग्राहकांची सततची वर्दळ दिसून आली.
पुण्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देण्याबरोबरच वारकरी शहरातील खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेताना दिसले. विविध स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांनी ठिकठिकाणी पिण्याचे पाणी, अल्पोपहार आणि वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिल्याने वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
दरम्यान, शनिवारवाडा परिसरातील रस्त्यांवर वारकऱ्यांची आणि नागरिकांची वाढलेली वर्दळ लक्षात घेता वाहतूक काही काळ संथ झाली. तरीही पोलीस आणि वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध व्यवस्था ठेवत वाहतुकीचे नियमन केले. पर्यटक, नागरिक आणि वारकरी यांचा एकत्रित सहभाग असल्याने परिसरात उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.
यंदाच्या वारीने पुणे शहराला भक्ती, संस्कृती आणि पर्यटनाचा अनोखा संगम अनुभवण्याची संधी दिली असून बाजारपेठांपासून ऐतिहासिक वास्तूंपर्यंत सर्वत्र विठ्ठलनामाचा गजर आणि वारकरी संप्रदायाचा उत्साह पाहायला मिळाला. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामादरम्यान दरवर्षी पावसाची हजेरी लागते. मात्र यंदा पालखी पुण्यात मुक्कामी असताना पावसाने विश्रांती घेतली आहे.






