फोटो सौजन्य - Social Media
‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या आगामी मराठी चित्रपटातील ‘डार्लिंग’ हे नवं गाणं प्रदर्शित झालं असून, सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. याआधी चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आता ‘डार्लिंग’ या गाण्यातून गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवरील धमाल, मैत्रीचे रंग आणि तरुणाईचा उत्साह आकर्षक पद्धतीने सादर करण्यात आला आहे.
या गाण्याला गायिका मुग्धा कऱ्हाडे यांनी आवाज दिला असून, अनुराग गोडबोले यांनी संगीतबद्ध केले आहे. गाण्याचे बोल चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांनी लिहिले आहेत. विदुला चौघुले, नेहा खान आणि रुचिरा जाधव यांची गर्ल गँग गोव्यातील ट्रिप एन्जॉय करताना या गाण्यात दिसते. तिघींचे स्टायलिश लुक्स, उत्साही सादरीकरण आणि ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे गाण्याला वेगळीच रंगत प्राप्त झाली आहे.
गाण्याविषयी बोलताना दिग्दर्शक व गीतकार विजू माने यांनी सांगितले की, पडद्यावर दिसणाऱ्या ग्लॅमरस दृश्यांमागे एक वेगळा विचार आहे. महाराष्ट्रातील अनेक तरुण, विशेषतः शेतकरी कुटुंबातील मुलांना विवाहासाठी येणाऱ्या अडचणी हा गंभीर सामाजिक विषय लक्षात घेऊन हे गाणे तयार करण्यात आले आहे. पडद्यावर दिसणारे आनंदी क्षण, सुंदर नाती आणि लग्नाचे प्रसंग पाहताना प्रत्येक तरुणाच्या मनात आशा आणि सकारात्मकता निर्माण व्हावी, हा या गाण्यामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फ्रेंडशिप डेच्या आठवड्यात, ३१ जुलै रोजी प्रदर्शित होणारा ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट मैत्री, धमाल, नॉस्टॅल्जिया आणि गोव्याच्या मस्तीचा अनुभव प्रेक्षकांना देणार आहे. विजुमेनिया प्रा. लि. आणि लाईट अँड शेड प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती विजू माने यांनी केली आहे. पटकथा आणि संवाद विजू माने, राहुल आवटे आणि कुशल बद्रिके यांनी लिहिले आहेत. चित्रपटात अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाण, विदुला चौघुले, नेहा खान आणि रुचिरा जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.






