फोटो सौजन्य - Social Media
हवामान विभागानुसार अपेक्षित थंडी अद्याप पडलेली नसल्याने स्थलांतरणाची गती मंदावली. उत्तरेकडील देशांमध्ये थंडीचा कडाका वाढताच हे पक्षी सुरक्षित आणि अन्नसंपन्न ठिकाणांच्या शोधात दक्षिणेकडे झेपावतात. आता तापमानात घट सुरू झाल्याने हळूहळू पक्ष्यांची संख्या वाढताना दिसत आहे. पहाटेच्या वेळी विविध तलावांवर पक्ष्यांचा कलरव ऐकू येऊ लागला असून निसर्गप्रेमींना हा आनंददायी बदल जाणवत आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही कापशी, काटेपुर्णा, दगडपारवा, सिसा-मासा, मच्छी तलाव, आखतवाडा, कुंभारी, दुधाळा, घुसर, पोपटखेड, शिवणी, सुकळी आणि जिल्ह्यातील इतर अनेक लहान-मोठ्या जलाशयांवर या परदेशी पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे. या तलावांवर सकाळी पक्षी निरीक्षणासाठी मोठी गर्दी होताना दिसते. अभ्यासक, छायाचित्रकार, विद्यार्थी आणि निसर्गप्रेमी यांना या काळात पक्षी निरीक्षणाचा मनसोक्त आनंद मिळतो.
अकोल्यातील पक्षी अभ्यासक देवेंद्र तेलकर यांच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील जलाशयांवर सध्या स्पॉटबिल डक, ब्राम्हणी डक, कॉम्बडक, लेसर विसलिंग डक, पिनटेल डक, कॉमन टील, गार्गेनी, नॉर्दर्न पोचार्ड, कॉमन पोचार्ड, पेन्टेड स्टॉर्क, ओपनबिल स्टॉर्क, स्यूनबील यांसारख्या परदेशी पाहुण्या पक्ष्यांचे दर्शन होत आहे. त्यांच्या संख्येत आगामी काही आठवड्यांत वाढ होण्याची शक्यता आहे.
तसेच, स्थानिक पक्ष्यांमध्ये कॉमन बी-ईटर, ब्लू-टेल बी-ईटर, बुलीनेक स्टॉर्क, पेंटेड स्नाइप, कॉमन स्नाइप, ब्लॅकविंग टील्ट, सॅण्डपायपर, वुड सॅण्डपायपर, रेडशँक, रफ, ब्लॅक आयबिस, ग्लॉसी आयबिस, रिंग प्लोव्हर, रिव्हर टर्न आदी विविध प्रजातींचे दर्शनही घडत आहे. स्थानिक आणि स्थलांतरीत पक्ष्यांमधील ही विविधता जिल्ह्यातील जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते.
थंडी वाढताच तलावांच्या काठावर पहाटेच्या वेळी पक्ष्यांची रेलचेल अधिक गजबजलेली दिसते. छायाचित्रकारांना दुर्मिळ प्रजातींचे फोटो टिपण्याची संधी मिळते, तर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निरीक्षणातून अभ्यास करण्याचा अनुभव मिळतो. स्थलांतरीत पक्ष्यांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण तयार होत असून निसर्गप्रेमींमध्येही त्याबद्दल उत्सुकता वाढली आहे. आगामी काही आठवड्यांत थंडी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात स्थलांतरीत पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल असा अभ्यासकांचा अंदाज आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हिवाळी पाहुण्यांचे आगमन पक्षीप्रेमींसाठी आनंददायी ठरणार आहे.






