मंत्री विखेंचा आमदार थोरातांना टोला
आमच्या मुलाचा छंद जोपासायला आम्ही सक्षम आहोत. याबाबत आम्हाला आमदार बाळासाहेब थोरातांनी (Balsaheb Thorat) शिकविण्याची गरज नाही, असा मिश्किल टोला महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) यांनी काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांना लगावला आहे. माजी खासदार सुजय विखे यांनी विधानसभा लढविण्याची व्यक्त इच्छा केली होती. त्यांच्या या इच्छेवर आमदार बाळासाहेब थोरात यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेवर आता महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिलं आहे.
हेदेखील वाचा- उरण हत्याकांडातील आरोपीला कठोर शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करणार – रूपाली चाकणकर
माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी विधानसभा लढविण्याची व्यक्त इच्छा केली होती. सुजय विखे यांना विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत विचारलं असता, त्यांनी सांगितलं होतं की, उत्तर भागामध्ये श्रीरामपूर मतदार संघ हा राखीव आहे. कोपरगावचे राजकारण खुप क्लिष्ट आहे. त्यामुळे राहुरी आणि संगमनेर हेच पर्याय माझ्यासमोर आहेत. कारण याही तालुक्यात अनेकजण इच्छुक आहेत. त्यांच्यात एकमत झाले नाही आणि माझ्या नावावर एकमत होत असेल तर मी तयार आहे. माझे काम फक्त अर्ज करण्याचे आहे. पक्षाने आदेश दिला तर, त्यानुसार मी पुढे निर्णय करणार आहे.
हेदेखील वाचा- गोंदिया जिल्ह्याला पावसाचा फटका; 20 लाख क्विंटल धान अद्यापही केंद्रातच
डॉ.सुजय विखे पाटील यांनी संगमनेर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याचे सुतोवाच केल्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली होती. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील एका कार्यक्रमात बोलताना थोरातांनी म्हटलं होतं की, मोठ्यांचं लाडक लेकरु आहे ते, त्यांचा जर उभं राहण्याचा छंद असेल तर पक्षाने किंवा पालकांनी तो छंद पुरवावा. बाळासाहेब थोरात यांच्या या वक्तव्यावर आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिलं आहे.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आपण तर सर्व घरदार राजकारणात उतरविलं आहे. भावापासून ते जावयापर्यंत सर्वच कुटुंब राजकारणात उतरवून तुम्ही तुमचे छंद पुर्ण केले आहेत. डॉ.सुजय हे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. त्यांच्या मनात काय विचार आहे तो योग्यच असेल. पण या तालुक्यात निर्माण झालेल्या हुकूमशहाने तालुका पुर्ण उध्वस्त केला आहे. केवळ ठराविक लोकांचा विकास झाल्याने तालुक्याचे काय झाले आहे, हे जनता रोज अनुभवत आहे. लोकांना आता नवीन चेहरा हवा आहे आणि तीच भावना लोकांनी आजच्या मेळाव्यातून व्यक्त केली आहे. लोकभावनेचा आदर करायचा हीच माझी भूमिका आहे. याबाबत पक्ष श्रेष्ठींना कळवून योग्यतो निर्णय ते करतील.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे डॉ.सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारी बाबत आता चर्चा सुरु झाल्या आहेत. डॉ.सुजय विखे पाटील यांना उमेदवारी मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.