राज्यातील अनेक भागांत वाढतोय पावसाचा जोर; अनेक जिल्ह्यांत नद्यांना पूर(फोटो- istockphoto)
रायगड: आज सकाळपासूनच राज्यभरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. रायगडमधील काही नद्यांनी धोका पातळी गाठली आहे. नागोठणे बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याची माहिती समोर येत आहे. तर रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शाळा आणि महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत रायगडमध्ये 130 मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. कुंडलिका आणि अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे रायगड येत्या काळात अति ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने आज शाळा आणि महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर देखील काही ठिकाणी पाणी सचल्याचे समोर येत आहे. मुसळधार पावसाने काही प्रमाणात वाहतुकीवर देखील परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
रायगड जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जोरदार पावसामुळे गरज असल्यास नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे. काही नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. बाजारपेठेत पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील 24 तास धोक्याचे
भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली. राज्यात मागील २४ तासांमध्ये (१९ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) मुंबई शहर जिल्ह्यात १४२.६ मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड जिल्ह्यात १३४.१ मिमी, पालघर १२०.९ मिमी, ठाणे ९०.३ मिमी आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात ६०.५ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
खडकवासला धरण परिसरात होत असलेला पाऊस आणि खडकवासला धरणामध्ये येत असलेल्या पाण्याचा प्रमाण पाहता खडकवासला धरणातून आज १९ जून रोजी दुपारी एक वाजता २ हजार क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात येणार आहे. पावसाचे प्रमाण पाहता या विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुणे महानगरपालिका परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले.