Photo Credit : Social Media
पुणे : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रताप दररोज समोर येत आहेत. पण त्यांची अरेरावी संपण्याचे काही नाव घेत नाहीये. पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी नोटीस बजावून त्यांना पुणे आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण पूजा यांनी मात्र पुणे पोलिसांची नोटीसच धुडकावून लावली आहे.
पुण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पूजा यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर त्यांची वाशिम येथे बदली करण्यात आली. डॉ. दिवसे यांच्या आरोपांसंदर्भात लेखी जबाब नोंदवण्यासाठी पुणे पोलिसांनी त्यांना नोटीस बजावून पुणे आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले. पण तरीही त्या अद्यापही वाशिममधील शासकीय विश्रामगृहात मुक्कामी असून त्यांनी विश्रामगृहात राहण्याची मुदत वाढवून घेतली आहे. त्यामुळे त्या जबाब नोंदवण्यासाठी पुणे आयुक्त कार्यालयात जाणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर यांनी उद्या सकाळपर्यंत विश्रामगृहात राहण्यासाठी मुदत वाढवून घेतली आहे. त्यामुळे त्या आज सांयकाळी वाशिमहून निघण्याची शक्यता आहे. त्या पुणे किंवा थेट दिल्लीकडे रवाना होऊ शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. पण गेल्या दोन-तीन दिवसात त्यांनी यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही.
खरेतर, पुणे पोलिसांची नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी गुरूवारीच पुण्याला जाणे अपेक्षित होते. पण त्यांच्या हालचाली पाहता खेडकर त्यांनी पुणे पोलिसांची नोटीस धुडकावल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जबाब नोंदवण्यासाठी पूजा खेडकर पुणे आयुक्त कार्यालयात जाणार का, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पूजा खेडकर यांचे कारनामे समोर आल्यानंतर त्यांचे प्रशिक्षण थांबवण्यात आले आहे. पण त्यांच्यावर केलेली ही कारवाई पुरेशी नाही, त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. इतकेच नव्हे तर, त्यांनी ज्या प्रकारे प्रशासनाची फसवणूक केली. त्यावरून त्यांच्या फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली आहे.