नवे सरकार कधी स्थापन होणार? दीपक केसरकरांनी दिली महत्त्वाची माहिती (फोटो सौजन्य-X)
Maharashtra government formation News In Marathi: महाराष्ट्रात महायुती आघाडीच्या विजयानंतर मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेला उधाण आलं आहे. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्यावर पदावर राहण्यासाठी सातत्याने दबाव आणत आहेत. मात्र, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याच्या समर्थनात आहेत. देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादीचाही पाठिंबा आहे. याचदरम्यान आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे देखील राजभवनावर दाखल झाले असून त्यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेत एकट्या भाजपला १३२ जागा मिळाल्या आहेत, तर शिवसेनेला ५७ आणि राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या आहेत.
या सर्व घडामोडींदरम्यान महाराष्ट्रात सध्या एका सूत्रावर चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे यांना केंद्रीय मंत्री, तर त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याचे बोलले जात आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री होणार आहेत. तसेच एकनाथ शिंदे राजभवनात गेले, त्यावेळी त्यांच्यासोबत दीपक केसरकरही होते. राजीनामा देऊन राजभवनातून बाहेर येत असताना दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. “एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे. नवीन सरकार अस्तित्वात येण्याआधी ती औपचारिकता असते” असं दीपक केसरकर म्हणाले. “काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. आजपासून ते राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील” असं दीपक केसरकर म्हणाले.
अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला राजीनामा, राजभवनात काय घडलं?
सरकार कधी स्थापन होणार? यावर दीपक केसरकर यांनी नवीन सरकार लवकरच स्थापन होईल, असं सांगितलं. “भाजपची गटनेता निवडीसाठी कदाचित उद्या बैठक होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तिन्ही नेते एकत्र बसतील आणि त्यानंतर चर्चा होईल. मग पक्ष श्रेष्ठींकडे जातील. पक्ष श्रेष्ठी जो काही निर्णय घेतील, त्यानुसार ठरेल” असं दीपक केसरकर म्हणाले.
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? या प्रश्नाचे उत्तर देताना दीपक केसरकर म्हणाले, “प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची भावना असते की, आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा” तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलय, ‘जो निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह घेतील तो मान्य असेल’, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.
“भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत बैठक बोलावली असून एकनाथ शिंदे तिथे जाणार आहेत. दिल्लीतले निरीक्षक इथे आले, तर म्हणजे तो भाजपाचा अंतर्गत विषय आहे, त्याबद्दल मी भाष्य करणार नाही” असं दीपक केसरकर म्हणाले. “आम्ही एकत्र आलो आहोत, सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल,” दीपक केसरकर म्हणाले. एकनाथ शिंदे नाराज आहेत का? या प्रश्नावर दीपक केसरकर म्हणाले की, “एकनाथ शिंदे अजिबात नाराज नाहीत. भाजपचे पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल”, अशी प्रतिक्रीया केसरकरांनी दिली.