कल्याण पूर्वेत भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या केबल कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणात सहा आरोपींपैकी चार आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे चारही आरोपींनी पोलीस न्यायालयात हजर करणार आहेत. या प्रकरणावर पोलिसांनी बोलणे टाळले आहे. मात्र या हल्ल्या मागे कोणी तरी असावे अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण कार्यालयावर हल्ला करण्या आधी जो काही वाद केला गेला एका कटाचा भाग असू शकतो. या अनुषंगाने पोलीस तपास करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड यांनी द्वारली येथील जागेच्या वादातून कल्याण पूर्वेचे शिवसेना शिदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची घटना घडली. सध्या महेश गायकवाड आणि त्याचा साथीदार राहूल पाटील यांच्यावर ठाणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर आमदार गायकवाड यांच्या सह पाच जणांना प्रथम पोलिसांनी अटक केली. त्यांना पहिल्या टप्प्यात १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यांची रवागनी न्यायालयीन कोठडीत झाली. सध्या आमदार गायकवाड यांच्यासह पाचही आरोपी तळोजा कारागृहात आहेत. आमदार गायकवाड यांच्या केबल कार्यालयाबाहेर एक कर्मचाऱ्यांची बाईक उभी होती. या बाईकमध्ये चावी टाकली. कार्यालयातील एक व्यक्ती बाहेर आला. त्याने त्याला काय करतो असे विचारले असता त्याने त्याला शिव्या घालण्यास सुरुवात केली. त्याने काही साधीदारांना बोलावून घेतले.
साथीदार एका महागड्या कारमधून आले. त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपीना अटक केली आहे. यापैकी तिघांना कार्यालयातील कर्मचाऱ्याने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अटक आरोपींची नावे मयूर चव्हाण (रा.मुरबाड) व्यंकटेश कोणार (रा.नांदिवली), करण अर्जय गुप्ता (रा.काटेमानिवली), स्वरुप सोरटे (रा. नांदिवली) या चौघांची नावे आहे. आधी सांगितले गेले की ही घटना किरकोळ वादातून झाली आहे. परंतू ज्या प्रकारे वादाची सुरुवात करण्यात आली. केबल कार्यालयास लक्ष्य करण्यात आले. एका कारमधून बसून आरोपी येतात. या मागे कोणीतरी असल्याची दाट शक्यता आहे. या अनुषंगाने पोलीस तपास करणार का हा मोठा सवाल आहे. पोलिसांनी कारही जप्त केली आहे. या प्रकरणावर काही एक भाष्य करण्यास तयार नाहीत.