सातारा : पश्चिम महाराष्ट्राच्या साखरपट्ट्यात दहा लोकसभा मतदारसंघांपैकी सातारा लोकसभा मतदारसंघ हा राजकीय दृष्ट्या प्रचंड संवेदनशील आहे. महायुतीने या जिल्ह्यामध्ये लावलेला जोर, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने ऐनवेळी साताऱ्यावरील सोडलेला दावा व शरदचंद्र पवार गटाने महाविकास आघाडीच्या माध्यमातून दिलेली लढत यामुळे यंदाची सातारा जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची लढत प्रचंड चुरशीची ठरली.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या सातारा जिल्ह्यात यंदा प्रथमच घड्याळाची टिकटिक ऐकायला मिळणार नाही, मात्र पवार गटाची तुतारी वाजणार की बालेकिल्ल्यात कमळ फुलणार? याची सर्वांना उत्सुकता लागून राहीली आहे.
सातारा मतदारसंघांमध्ये भाजपकडून उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडून शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत झाली आहे. सहकार क्षेत्राचा प्रभाव असलेल्या या मतदारसंघात येथील मतदार स्थानिक नेत्यांशी जोडला गेलेला आहे. त्याचा परिणाम येथील निवडणुकीत होताना दिसला. शशिकांत शिंदे यांच्या तुलनेत उशिरा उमेदवारी जाहीर झाल्यामुळे उदयनराजे भोसले यांना प्रचारासाठी कमी वेळ मिळाला. तरीही कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण या तीन मतदारसंघांमध्ये अकरा दिवस प्रचार करून उदयनराजे यांनी चांगली वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. पाटण तालुक्यात उदयनराजे यांच्यासाठी स्वतः पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ११ सभा घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कराड येथील सभेचा फायदा उदयनराजे यांना होताना दिसला.
काेणत्या मतसंघात काेणाला फायदा ?
महायुतीतील घटक पक्षांनी प्रभावी प्रचार केल्याने कोरेगाव, वाई, सातारा या विधानसभा मतदारसंघात उदयनराजे यांना फायदा मिळू शकतो, असे जाणकारांचे मत आहे. या उलट कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण या विधानसभा मतदारसंघांमध्ये शशिकांत शिंदे यांच्या बाजूने वातावरण अनुकूल असल्याचा दावा केला जात आहे. विशेषत: कराड दक्षिण आणि पाटण मतदारसंघातील बहुतांश माथाडी कामगारांचा कल हा शशिकांत शिंदे यांच्या बाजूने जाताना दिसेल, असे अंदाज व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील उलटफेर संवेदनशील
महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय टशन अधिक धारदार होताना दिसून येत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये १२ लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सातारा जिल्ह्यात ६३ टक्के मतदान झाले आहे. मतदार राजाचा हा कौल कोणाला मिळणार याची राजकीय उत्सुकता आहे. पश्चिम महाराष्ट्राचा साखरपट्ट्याचा मध्य म्हणून सातारा जिल्ह्याची भौगोलिकता ही प्रसिद्ध आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील उलटफेर हे राजकारणाच्या दृष्टिकोनातून संवेदनशील असणार आहेत.