फोटो सौजन्य - Social Media
Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य येथे बुद्ध पौर्णिमा निमित्ताने वन्यप्राणी गणना उपक्रम उत्साहात पार पडला. चांदण्यांच्या प्रकाशात दोन दिवस चाललेल्या या उपक्रमात ४४ मचाणांवरून निरीक्षण करत वन्यजीवांचा सखोल अभ्यास करण्यात आला. अचूक माहिती मिळवण्यासाठी अभयारण्यात ४४ कॅमेरे बसवण्यात आले होते, ज्यामुळे प्राण्यांची हालचाल टिपणे सोपे झाले. या गणनेदरम्यान एकूण ६३५ वन्यप्राणी कॅमेऱ्यात कैद झाले. यामध्ये २५ बिबटे, २९ अस्वल, २३१ रानडुक्कर, २० सायाळ, २२ ससे, ९ तडस, २८ भेडकी, १४५ निलगाय, ८१ मोर, ४ चिंकारा, १९ हरीण, २ खवलेमांजर, ३ रानमांजर, १६ माकड आणि १ सांबर यांचा समावेश आहे. ही आकडेवारी अभयारण्यातील समृद्ध जैवविविधतेचे स्पष्ट चित्र दाखवते. ( Wildlife Census in Dnyanganga Sanctuary )
खामगाव वनपरिक्षेत्रातील २३ आणि बुलढाणा परिक्षेत्रातील २१ अशा एकूण ४४ मचाणांवरून वन्यजीवांचे निरीक्षण करण्यात आले. या उपक्रमात वनपरिक्षेत्र अधिकारी, वन कर्मचारी आणि वन्यजीव विभागातील अधिकारी सक्रियपणे सहभागी झाले होते. त्यांच्या समन्वयातून हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरणाबाबत जनजागृती हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या माध्यमातून स्थानिक नागरिकांमध्ये वन्यजीवांविषयी जागरूकता वाढली असून, पर्यावरण संवर्धनाची जाणीव अधिक दृढ झाली आहे. तसेच, मिळालेली माहिती भविष्यातील संवर्धन धोरण आखण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. (Dnyanganga Sanctuary )
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभयारण्यातील वनपाल, वनरक्षक, वनमजूर, वाहन चालक आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. अशा उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनाला चालना मिळत असून, जैवविविधतेचे महत्त्व समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचवले जात आहे.






