कुणबी प्रमाणपत्रासाठी चुकीचे निकष खपवून घेणार नाही : मनोज जरांगे-पाटील
पाटण : मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी कोल्हापूरहून बारामतीला जात असताना कराड येथे पाटण तालुका मराठा क्रांती मोर्चा सेवकांची भेट घेतली. यावेळी त्यांचे पाटण मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जंगी स्वागत करण्यात आले. पाटण तालुक्यातील सर्वात जास्त कुणबी नोंदी सापडल्या आहेत. मात्र, प्रमाणपत्र देण्यासाठी चुकीचे निकष लावून जाणुनबुजून अडथळे निर्माण केले जात आहेत, ते खपवून घेणार नाही. याबाबतीत माझ्याकडे अनेकदा तक्रारी आल्या आहेत. यासाठी मी लवकरच पाटणला भेट देणार आहे, असे आश्वासन मनोज जरांगे पाटील यांनी पाटणवासियांना दिले.
यावेळी मराठा क्रांती मोर्चा पाटण तालुक्याचे सेवक राजेंद्र निकम, प्रशांत पाटील, शंकरराव मोरे, चंद्रकांत शिर्के, धैर्यशील पाटणकर, जयवंतराव सुर्वे, मनोहर यादव, राहुल शेडगे, विक्रम यादव, प्रदीप घाडगे, अनिल भोसले, नितीन पिसाळ, शंकर मोहिते, लक्ष्मण चव्हाण, शैलेश जगताप, राजेंद्र मोरे, कुमार साळुंखे, सदाशिव पवार, बाबा पवार, प्रविण उदुगडे, संजय कांबळे, कोंडीबा संकपाळ आदी मराठा सेवक उपस्थित होते.
मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील हे सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता कोल्हापूर दौरा आटोपून फलटण बारामतीला जाताना कराड येथे मराठा सेवकांना भेटले. कोल्हापूर नाका, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दत्त चौक, सैदापुर असे ठिकठिकाणी मराठा सेवकांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मराठा सेवकांनी स्थानिक पातळीवर कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा पाढा त्यांच्यासमोर वाचला.
यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, आरक्षण हा आपला अधिकार आहे. कोणी जाणुनबुजून अडचणी निर्माण करत असेल तर ते खपवून घेणार नाही. अशा शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तक्रारी करा. त्यांच्यावर कारवाई करण्यास सरकारला आपण भाग पाडू. यानंतर कराड तालुक्यातील शहापूर येथील शहीद जवान अर्जुन राजेंद्र जाधव यांच्या घरी जाऊन जाधव कुटुंबीयांचे सांत्वन केले. यानंतर ते सातारा-फलटण-बारामतीकडे रवाना झाले.
स्व. यशवंतराव जगताप यांना श्रद्धांजली
पाटणचे मराठा क्रांतीचे सेवक स्व. यशवंतराव जगताप (बाबा) यांचे यावेळी स्मरण करण्यात आले. मराठ्यांचा सच्चा मावळा हरपल्याची भावना मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. स्व. यशवंतराव जगताप (बाबा) यांची मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांना भेटण्याची तीव्र इच्छा होती. मात्र त्यांच्या आकस्मिक निधनाने ती अपूर्ण राहिली असल्याची भावना चिरंजीव शैलेश जगताप यांनी व्यक्त केली यावेळी पाटणचे मराठा सेवक उपस्थित होते.
प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी करणार आंदोलन; 29 जूनपासून राज्यव्यापी धरणे आंदोलनाचा इशारा






