'लाडकी बहीण'नंतर राज्यातील महिलांसाठी सरकारने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय; आता महिलांना... (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. महायुती सरकारकडून महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. निवडणुकांमध्ये देखील या योजनेवरुन जोरदार प्रचार झाला. राज्यातील निवडणुकांच्या प्रचारामध्ये महिलांवर आधारित प्रचार करण्यात आला. यामध्ये आता महिलांसाठी महायुती सरकारने आणखी एक भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे.
लवकरच होळीचा सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारने भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे. लाडक्या बहिणींना साडी भेट देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. साडी देण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्य यंत्रमाग महामंडळाद्वारे अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांच्या यादीनुसार साड्यांचे गठ्ठे तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक तालुक्यातील रेशन दुकानात साड्या पोहोचवण्यात येणार आहेत. होळीपर्यंत प्रत्येक लाभार्थी कुटुंबांना एक साडी दिली जाणार आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राज्य सरकारचे 03 मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. महायुती सरकारकडून यामध्ये लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर आता महिलांना साड्या देखील मिळाल्या आहेत. लाभार्थी महिलांनी रेशन दुकानात जाऊन ई-पॉस मशीनवर अंगठा ठेवल्यानंतर त्यांना एका कार्डवर एक साडी दिली जाणार आहे. राज्याच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागातर्फे यावर्षीही अंत्योदय गटातील प्रत्येक शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जळगाव जिल्ह्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना साड्या मिळणार आहेत. रेशन दुकानांवर अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील 1 लाख 35 हजार 302 महिलांना होळी सणापूर्वीच साडी मिळणार आहे. अन्नधान्य पुरवठा विभागाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील सर्व रेशन दुकानांवर अंत्योदय कार्डधारकांच्या संख्येनुसार साड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी गायकवाड यांनी दिली. महिलांनी होळी निमित्त साडी मिळणार असल्यामुळे लाडक्या बहिणी आनंदात आहे. परंतु साडीचा दर्जा चांगला असावा, अशी अपेक्षा महिलांकडून व्यक्त केली जात आहे.
लाडक्या बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. याच योजनेमुळे भाजप-महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठ्या बहुमताने विजय मिळाला आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला योजनेच्या रकमेत वाढ होण्याची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 8 महिन्यांपासून महागाई भत्ता न मिळाल्याने संतप्त आहे. सरकारी कर्मचारी काम बंद आंदोलनाची तयारी करत आहेत. राज्यात सरकारी, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि अधिकारी श्रेणींसह सुमारे 17 लाख कर्मचारी आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना गेल्या सुमारे 8 महिन्यांपासून महागाई भत्त्याचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. लाडकी बहीण योजनेंतर्गत दरमहा देण्यात येणाऱ्या अंदाजे 3,700 कोटी रुपयांमुळे सरकारी तिजोरी रिकामी झाली आहे.