मुंबई : उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबईत येऊन जेव्हा त्यांच्या राज्यासाठी उद्योगपतींशी चर्चा करत होते, तेव्हा आपले मुख्यमंत्री नाशकातील पालापाचोळा-कचरा गोळा करुन ठाकऱ्यांची शिवसेना फोडण्याचा आव आणत होते, अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उ. प्रदेश, बिहारचे राज्यकर्ते मुंबईत येऊन गुंतवणुकीची लूट करत असताना मुख्यमंत्री शिवसेना पाडण्याच्या कामात मग्न असल्याची टीकाही करण्यात आलीय. माणसाला त्याच्या लायकीपेक्षा वरचे पद मिळाले की असे घडायचेच अशी टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर करण्यात आलीय.
गुंतवणुकीसाठी हे चालेलत दावोसला- ठाकरे
योगी मुंबईतून उ. प्रदेशात गुंतवणूक नेत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि त्यांचं बिऱ्हाड पुढील महिन्यात गुंतवणूक आणण्यासाठी जर्मनीत दावोसला बर्फात खेळण्यासाठी जात असल्याची टीकाही करण्यात आलीय. योगींनी राज्यातील उद्योजकांना केलेलं आवाहन राज्य सरकारनं गांभिर्यानं घेण्याची गरजही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलीय. राज्यातून गेल्या पाच महिन्यात अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत याची आठवणही अग्रलेखात करुन देण्यात आलीय.
देशात मॅचफिक्सिंग सुरु
पंतप्रधान मोदी यांनी देशासमोर ठेवलेल्या ५ ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेसाठी देशातील प्रमुख राज्यांत स्पर्धा सुरुये. यात मॅचफिक्सिंग करुन फक्त गुजरातला पुढे करण्याचे धोरण दिसते आहे. ते घातक असल्याची टीकाही ठाकरेंनी केलीय. देशातील सर्व राज्यांचे स्टेट्स ग्रोओथ रेट अर्थ मंत्रालयानं पाठवलेत. त्यात पहिल्या पाचमध्ये एकही भाजपाशासित राज्य नाही. महाराष्ट्र तर पहिल्या पंधरातही नसल्याची टीका ठाकरेंनी केलीय. ज्या महाराष्ट्राचा विकास दर कोसळला आहे, त्याच राज्यात येऊन योगींनी ५ लाखांची गुंतवणूक उ. प्रदेशात नेल्याचं जाहीर केलं. त्यावेळी ही गुंतवणूक बाहेर जाऊ नये यासाठी शिंदे-फडणवीस काय करत होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.
मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे व्यावसायिक परममित्र अजय आशर यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या औद्योगिक विकासासाठी मैत्री नावाची संस्था उभी केली. त्या मैत्रीने गुंतवणूक कशी बाहेर जाऊ दिली, असा सवाल विचारण्यात आलाय. या पाच लाख कोटींमागेही टक्केवारीची समृद्धी झाली का, असा सवालही विचारण्यात आलाय. दावोसला जाणाऱ्यांत या अजय आशर यांचाही समावेश असल्यावरुनही टीका करण्यात आलीय. योगींनी अयोध्येत महाराष्ट्र सदनच्या नावाखाली ५ कोटींची गुंतवणूक नेली, हा आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रकार आहे. मुख्यमंत्र्यांना मात्र चाळीस आमदार आणि खोक्यांची काळजी आहे, जमले तर शिवसेनेच्या वृक्षाखालचा पालापाचोळाही त्यांना गोळा करायचा आहे, अशी टीका सामनातून करण्यात आलीय.