चार नाही आठ मुले जन्माला घाला! ओवैसींचा नवनीत राणांवर टोला; प्रत्युत्तरात नागरिकत्व काढण्याची मागणी
एआईएमआईएम (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी भाजप नेते नवनीत राणा यांच्या विधानावर निशाणा साधला आहे. ज्यामध्ये राणा यांनी देशाची लोकसंख्या सुधारण्यासाठी हिंदूंना किमान तीन ते चार मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले होते. राणा म्हणाले होते की, पाकिस्तानसारखी परिस्थिती टाळण्यासाठी भारताची लोकसंख्या वाढविण्यासाठी हिंदूंनी अधिक मुले जन्माला घालावीत, याच विधानावर ओवैसी यांनी टीका केली आहे.
काही दिवसांपूर्वी राणा यांनी एका मौलानाच्या वक्तव्याचा संदर्भ देत, ‘जर ते १९ मुले जन्माला घालत असतील, तर हिंदूंनीही किमान ३-४ मुले जन्माला घातली पाहिजेत, असे विधान केले होते. या वक्तव्यावरून टीका करताना ओवैसी यांनी प्रचारसभेत जोरदार टोला लगावला. प्रचारसभेत बोलताना ओवेसी म्हणाले, ‘मोहन भागवत म्हणतात दोनपेक्षा जास्त मुले जन्माला घाला, राणा म्हणतात, चार मुले जन्माला घाला. मी सांगतो, तुम्ही चार नाही तर आठ मुले जन्माला घाला, आम्हाला त्याचं काही देणघेण नाही. पण द्वेषाचे राजकारण थांबवा. या प्रकारच्या विधानांमुळे जनतेचे लक्ष महागाई, बेरोजगारी, नागरी समस्या यांसारख्या मूळ मुद्द्यांवरून भरकटवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
एकीकडे महापालिका निवडणुकांचा प्रचार रंगात आला असताना, दुसरीकडे अशा वक्तव्यांमुळे आक्रमक अमरावतीतील राजकीय वातावरण अधिकच चिघळत असल्याचे चित्र आहे. या वादाचा मतदारांवर नेमका काय परिणाम होतो, याकडे आता
सर्वांचे लक्ष लागले आहे.
ओवैसी यांनी यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्यावरही निशाणा साधत, ‘जे आपल्या काकांचे झाले नाही, ते तुमचे काय होणार?’ असा सवाल उपस्थित केला. ‘घड्याळाची वेळ संपली असून आता पतंग उडवण्याची वेळ आली आहे,’ असे म्हणत एमआयएम उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
ओवैसीच्या वक्तव्यावर राणा यांनी तीव्र प्रतिक्रिया देत म्हटले, असदुद्दीन ओवैसी है खासदार आहेत, पण ते संविधानाबद्दल का बोलत नाहीत? भारतात राहून भारत माता की जय आणि वंदे मातरम् म्हणायला यांना लाज वाटते. पुढे जात त्यांनी, ओवैसी यांचे भारतीय नागरिकत्व काढून त्यांना पाकिस्तानात पाठवले पाहिजे. तिथे जाऊन दहा-वीस मुले जन्माला घातली, तर कुणी विचारणारही नाही, अशी बोचरी टीका केली. घुसखोरी, लोकसंख्या वाढ, पश्चिम बंगाल, आसाम, मुंबई, दिल्ली, तेलंगणा आदी राज्यांमधील परिस्थितीवर बोलण्याचे आव्हान देत, भारतामध्ये राहायचे असेल, तर संविधानाचा आणि राष्ट्राचा सन्मान करायलाच हवा, असेही राणा म्हणाल्या.






