संग्रहित फोटो
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अनेक पात्र उमेदवारांना रोजगाराची संधी मिळाली असली तरी काही अनियमितता, अपारदर्शकता आणि प्रक्रिया विलंबामुळे मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाल्याची भावना उमेदवारांकडून व्यक्त केली जात आहे. राज्यातील सर्व रिक्त पदांवर नवीन शैक्षणिक धोरणाऐवजी कायमस्वरूपी शिक्षकभरती करावी. कंत्राटी भरती बंद करावी, तसेच समूह शाळा योजना रद्द करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे.
आठ नऊ वर्षांमध्ये तिसऱ्यांदा शिक्षक भरती होत आहे. मे २०२५ मध्ये शिक्षक भरतीचा तिसरा टप्पा पूर्ण झाला. परंतु अद्याप रजिस्ट्रेशन चालू झालं नाही. यामुळे भावी शिक्षक चिंतेत आहेत आणि येत्या काही महिन्यांत निवडणूक प्रक्रिया चालू असल्यामुळे आचारसंहितेचा फटका बसत आहे. किमान आचारसंहिता संपल्यावर लगेच राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करावी. -प्रशांत शिरगुर, राज्य उपाध्यक्ष स्पर्धा परीक्षा विद्यार्थी
शिक्षक भरती व्हावी म्हणून व इतर शासकीय शिक्षक भरती संदर्भात असलेल्या धोरणाच्या विरोधात राज्यातील सर्व जिल्ह्यातून हजारो भावी शिक्षक नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या उंबरठ्यावर एल्गार मोर्चा काढणार आहेत.
राज्यातील शिक्षक नियुक्त नसल्याने शिक्षणाचा दर्जा ढासाळत असल्याचे दिसत आहे. सरकारच्याच चुकीच्या निर्णयामुळे राज्यातील १८ हजार पेक्षा अधिक जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडणार आहेत. अशा वेळी समूह शाळा ही गोंडस योजना सुरू करून सरकारी शाळा कायमच्या बंद करण्याचं षडयंत्र सुरू आहे. यांसह शिक्षक भरतीच्या आणि विविध मागणीसाठी हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्याचा आम्ही निर्धार केला आहे. – संदीप कांबळे, अध्यक्ष, युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना






