PSI Arjun Marathi Movie Released Date
मराठी फिल्म इंडस्ट्रीतल्या आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अंकुश चौधरी… अंकुशने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत स्वत:चं अढळ स्थान निर्माण केलं आहे. सध्या अंकुश त्याच्या अपकमिंग चित्रपटामुळे चर्चेत आहे. अंकुशने त्याच्या वाढदिवशी म्हणजेच ३१ जानेवारीला अनेक सुपरहिट चित्रपटांची घोषणा केली होती. या यादीमध्ये, ‘महादेव’, ‘पी.एस.आय अर्जुन’ आणि ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे २- कॉमेडी ऑफ टेरर्स’ अशा तीन अशा तीन चित्रपटांचा समावेश आहे. आता या यादीतील एका चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.
तब्बल दोन वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर आता अंकुश चौधरी रुपेरी पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या ९ मे ला अभिनेता अंकुश चौधरी ‘पी.एस.आय अर्जुन’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही तासांपूर्वीच अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते अभिनेत्याच्या आगामी चित्रपटासाठी आतुर आहेत. ‘पी.एस.आय अर्जुन’ चित्रपटामध्ये अंकुश चौधरी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता अंकुश पहिल्यांदाच पोलिसाच्या भूमिकेत दिसणार असल्याने त्याच्या या रुबाबदार लूकने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
अंकुश चौधरीच्या ‘पी.एस.आय अर्जुन’या आगामी चित्रपटाचे धमाकेदार पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. स्टाईल आयकॉन अंकुशच्या या जबरदस्त लूकमुळे इंटरनेटवर खळबळ उडाली. ‘पी.एस.आय. अर्जुन’चे पोस्टर पाहूनच त्याच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. अंकुश पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत असून त्याच्यासोबत एक श्वानही चित्रपटाच्या पोस्टरमध्ये दिसत आहे.
अभिनेता आणि श्वान दोघेही बुलेट बाईकवर दिसत आहेत. मराठमोळा बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखने अभिनेता अंकुश चौधरीला शुभेच्छा दिल्या आहेत. अंकुशच्या इन्स्टा पोस्टवर कमेंट करत रितेशने त्याच्या नव्या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. रितेश देशमुखच्या या खास पाठिंब्याने सर्वांचेच लक्ष वेधले असून त्याच्या या नव्या प्रवासाला चाहते आणि इंडस्ट्रीमधील मित्रमंडळींनी दिलेला भरभरून प्रतिसाद बघता, ‘पी.एस.आय अर्जुन’ चित्रपटावर आधीच हिट होण्याची मोहोर उमटवली आहे.
व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित ‘पी.एस.आय.अर्जुन’ हा चित्रपट येत्या ९ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शक भूषण पटेल आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत.