kiran mane shares emotional post on social media about her father death
प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने यांच्या वडिलांचं ३० मार्च २०२५ रोजी निधन झाले आहे, ते ८६ वर्षांचे होते. किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिलेली. अशातच आता किरण माने यांनी वडिलांच्या आठवणीत एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.
किरण माने यांनी वडिलांच्या निधनानंतर त्यांच्यासोबतच्या अखेरच्या आठवणींना पोस्टच्या माध्यमातून उजाळा दिला आहे. किरण यांच्या वडिलांनी त्यांच्याच (किरण यांच्या) मांडीवर अखेरचा श्वास घेतल्याचं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं. काय म्हणाले किरण जाणून घेऊया.
‘तो मी नव्हेच…’ ऑनलाईन फसवणूक झालेल्या प्रकरणावर सागर कारंडेची पहिली प्रतिक्रिया…
शेअर केलेल्या पोस्टमध्ये किरण माने काय म्हणाले ?
…माझ्या मांडीवर शांतपणे जीव सोडला दादांनी !
खूप धावपळ सुरू होती माझी. कोल्हापूरला इंद्रजीत सावंतांचा सत्कार झाला… नंतर चंद्रपूरला आंबेडकरी अस्मिता परिषदेसाठी गेलो. तिथून नागपूरला येऊन रात्री बाराच्या फ्लाईटनं पुणे एअरपोर्टवर उतरलो. दुसर्या दिवशीपासून नाशिकला शुटिंग सुरू होणार होतं. एक दिवसासाठी कशाला सातारला जायचं? शुटिंग संपल्यावर जाऊ सातारला, या विचारानं मी नाशिकला निघालोच होतो… पण बायकोच्या आग्रहाखातर अचानक निर्णय बदलला. गुढी पाडव्याच्या दिवशी सातारला घरी तीनचार तास थांबून मग नाशिकला जाऊ असं ठरवलं आणि सातारला आलो…
दादांच्या जवळ जाऊन बसलो. ते खुर्चीत शांत बसले होते. म्हटलं, “दादा मी नाशिकला चाललोय आजच लगेच.” काही बोलले नाहीत. फक्त हातानं खुणावलं की ‘शेजारी बस.’ मी बसलो पण दादा काहीच बोलेनात. मला वाटलं त्यांना झोप आलीय. त्यांना बेडवर झोपवण्यासाठी मी आणि बायकोनं दोन्ही बाजूनं उचललं तर पायातला जीव गेल्यासारखे अलगद खाली बसले… माझ्या मांडीवर डोकं ठेवलं आणि शेवटचा श्वास घेतला.
ज्या शांतसरळ मार्गानं जगले, तसेच शांतपणे गेले.
दादा, तुम्ही माझ्याकडून अपेक्षा ठेवल्या असतील तर फक्त याच ठेवल्या की, ‘चांगला माणूस हो, पैसा कमव पण चुकीच्या मार्गाने कमावू नकोस, प्रामाणिकपणा सोडू नकोस, सत्य बोलायला घाबरू नकोस आणि गोरगरिबांना यथाशक्ती मदत कर !’
दादा, काल तुमचे जुने मित्र आले होते… ते म्हणाले, “तुझ्या वडीलांकडे सुखी माणसाचा सदरा होता !”
तो सदरा याच गुणांमुळे तुम्ही कमावला होतात दादा. आणि तोच तुम्ही वारशात ठेवला आहे.जगी ऐसा बाप व्हावा । ज्याचा वंश मुक्तीस जावा ।।
– किरण माने…