Milind Gawali Shared His Special Experience Of Visiting Siddhivinayak Temple
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापूक झुपूक’ चित्रपट येत्या २५ एप्रिलला रिलीज होणार आहे. या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटाचा गेल्या काही दिवसांपूर्वीच ट्रेलर रिलीज झाला. त्यानंतर आता चित्रपटाची टीम आणि निर्माते सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. मुंबई, पुण्यासह वेगवेगळ्या शहरामध्ये चित्रपटाची टीम प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. आता अशातच चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेते मिलिंद गवळी यांनी मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या सिद्धीविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यांनी इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करत मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरातील खास अनुभव शेअर केला आहे. सोशल मीडियाद्वारे खास व्हिडीओ शेअर करत त्यांनी हा अनुभव सांगितला आहे.
कोण आहे Emma Bakr? रॅपर हनी सिंगला करत आहे डेट; Video Viral…
इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना मिलिंद गवळींनी कॅप्शन दिले की, “प्रत्येक गोष्टीचा योग घ्यावा लागतो, योग्य वेळी सगळ्या गोष्टी घडत असतात, परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय झाडाचं एकही पान हलत नाही. गेल्या अनेक वर्षात माझं सिद्धिविनायक गणपती बाप्पाचं दर्शन झालं नाही, आणि गेल्या चार दिवसांमध्ये दोन वेळा अतिशय सुंदर दर्शन झालं. काही दिवसापूर्वी “झापुक झुपूक” सिनेमाच्या Trailer launch च्या दिवशी, आम्ही सगळे सिनेमातले कलाकार सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला गेलो. तिथे दर्शन घेत असताना मनात विचार आला की माझ्या पत्नीला म्हणजे दिपाला सिद्धिविनायकाची खूप ओढ आहे. तर आमचं इतकं सुंदर दर्शन झालं ते खरंतर तिचं पण व्हायला हवं होतं. मी तिला घेऊन यायला हवं होतं, मी मनात म्हटलं एक दिवस तिला बाप्पाच्या दर्शनाला नक्की घेऊन येईन आणि अगदी दोन दिवसांनी प्रतीक गायकवाड नावाच्या गृहस्थाचा मला फोन आला, म्हणाला की सिद्धिविनायकाच्या आरतीला तुम्ही याल का? मला हा चमत्कार वाटला, मी त्याला म्हटलं हो मला नक्की आवडेल यायला, मी सह-पत्नी येईन आरतीसाठी आणि काल संकष्टीच्या दिवशी, सिद्धिविनायक मंदिराच्या गाभाऱ्यात मी आणि दिपा जवळजवळ दोन तास होतो. गणपती बाप्पाची सुंदर पूजा अर्चा, छान आरती झाली, सगळं अनुभवायला मिळालं. बाप्पाकडून एक वेगळीच ऊर्जा घेऊन घरी आलो. अगदी लहानपणापासून या मंदिरात आम्ही येतोय, दादरला राहत असताना माझी आई आणि दिपा दर मंगळवारी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जायच्या, दिपा दर महिन्याला मंदिरामध्ये पहिल्या मजल्यावर २१ रुपयांची पूजा करायची, तशी पूजा आज मंदिरात होते की नाही माहित नाही.पण असं सुंदर दर्शन आजपर्यंत कधीच झालं नाही. आपल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये एक वेगळीच ऊर्जा energy आहे. जी मला काल प्रकर्षाने जाणवली , आपल्याकडे खूप कमी मंदिरांमध्ये अशी दैवी ऊर्जा जाणवते. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.”