Maharashtra Govt Announces Prestigious Awards For Mahesh Manjrekar Anupam Kher And Mukta Barve
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली आहे. यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार, चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार, स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अशा पाच महत्त्वाच्या पुरस्कारांची घोषणा केली. ही घोषणा मंत्री आशिष शेलार यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेतून केली आहे.
यंदाचा चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध मराठी अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर (Mahesh manjarekar) यांना जाहीर झाला आहे. ह्या पुरस्कारासोबत महेश मांजरेकरांना ₹ 10 लाख रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, मानपत्र आणि चांदीचे पदक अशा गोष्टी देण्यात येणार आहे. याशिवाय, मराठीतील ज्येष्ठ गजल गायक भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे. १० लाख रुपये रोख रक्कम, मानचिन्ह, मानपत्र, शाल असे पुरस्काराचे स्वरूप देण्यात येणार आहे. याशिवाय फिल्म इंडस्ट्रीतील इतर कलाकारांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत.
हातात झाडू अन् कमरेला खोचलेली साडी, राधिकाचा नव्या चित्रपटातला हटके लुक रिलीज
प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिला व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार जाहीर झाला आहे. तिला जाहीर झालेल्या पुरस्काराचे स्वरूप ६ लाख रु. रोख रक्कम, मानपत्र, स्मृतिचिन्ह, चांदीचे पदक असे असणार आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांना बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये मानाचे समजला जाणारा, राज कपूर जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. अनुपम यांना जाहीर झालेल्या पुरस्काराचे स्वरूप १० लाख रु. रोख रक्कम, मानपत्र, स्मृतिचिन्ह, चांदीचे पदक असे असणार आहे. तर, स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री काजोल देवगण हिला जाहीर झाला आहे. काजोलला जाहीर झालेल्या पुरस्काराचे स्वरूप ६ लाख रु. रोख रक्कम, मानपत्र, स्मृतिचिन्ह, चांदीचे पदक असे असणार आहे. सर्व पुरस्कारांचे वितरण २५ एप्रिल २०२५ रोजी मुंबईतील एनएससीआय डोम येथे एका भव्य समारंभात होणार आहे. हा पुरस्कार कोणाच्या हस्ते मिळणार ? अद्याप ही गोष्ट गुलदस्त्यात आहे.