विजया बाबर ऊर्फ कमळीशी खास बातचीत (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मराठी मालिकांचे विषय सध्या वेगवेगळे पहायला मिळत आहेत. त्यांच्या वैविध्यामुळे प्रेक्षकांनाही मालिका आवडत आहेत आणि त्यापैकी ‘झी मराठी’वरील मालिका ‘कमळी’. गावातून स्वप्नं घेऊन आलेल्या मुलीही ही कहाणी सर्वांना आपलंसं करत आहे आणि ही भूमिका आपल्यासाठीच लिहिली गेली आहे असं वाटावं इतक्या सहजतेने अभिनेत्री विजया बाबर साकारत आहे.
दिवाळीच्या निमित्ताने सध्या कमळी मालिकेत नक्की काय चालू आहे आणि विजया बाबरने या पात्रासाठी कशी तयारी केली? तिला कोणते आव्हान आले? पहिल्यांदाच Times Square वर मराठी मालिकेचा प्रोमो झळकला याबाबत विजयला काय वाटते या सर्वांवर मनसोक्त गप्पा विजयाने ‘नवराष्ट्र’सह मारल्या आहेत. विजयाच्या चाहत्यांसाठी तर कमळी आणि विजयामधील साम्यही आम्ही जाणून घेतले आहे, चला तर मग नक्की वाचा ही मुलाखत.
Times Square वर पहिल्यांदाच मराठी मालिकेचा प्रोमो झळकला कसं वाटतंय?
हा प्रश्न अगदी विचारून व्हायच्या आधीच मनापासून आणि आनंदाने विजयाने बोलायला सुरूवात केली, ‘इतक्या मोठ्या ठिकाणी कमळीचा प्रोमो झळकणार हे कळल्यापासूनच आनंद गगनात मावत नव्हता. सर्व काही अचानक आणि विचारांच्याही पलीकडे होतं त्यामुळे एक सुखद धक्का होता’, विजया पुढे म्हणाली की, इतकी प्रचंड आनंदी होते आणि त्याशिवाय दिवसभर हा प्रोमो दर १ मिनिटने झळकणार होतो त्यामुळे आम्ही सर्वांना अगदी टायमर लाऊन ठेवला होता
इतकंच नाही तर तिच्या मित्रमैत्रिणींनी तिथल्या दुकानदारांचा नंबर मिळवून जुगाड करून अक्षरशः तिला व्हिडिओ कॉल करून हा आनंद मिळवून दिला असल्याचे तिने खूपच अभिमानाने आणि आनंदाने सांगितले. आपल्या आयुष्यातील हा सर्वात मोठा दिवस असल्याचंही विजया म्हणाली.
कमळीच्या भूमिकेसाठी कशी तयारी केली?
कमळीची भूमिका ही थोडी वेगळी होती. ही भूमिका ऑडिशन देऊनच मिळाली असल्याचं विजया म्हणाली. उत्साहाने विजयाने सांगितले की, ‘जेव्हा या भूमिकेसाठी ऑडिशन होती तेव्हा मी गावच्या जत्रेत होते आणि तिथूनच ऑडिशन पाठवली होती. एक देवीचा आशिर्वादच असल्यासारखे वाटले. आतापर्यंत कबड्डी कधीच खेळले नव्हते, त्यामुळे त्यासाठी बॉडी वर्क करणे महत्त्वाचे होते आणि त्याकडे लक्ष केंद्रित केले’, असं विजया म्हणाली
भाषेसाठी काही विशेष मेहनत घेतली का?
विजयाने अगदी सहज म्हटलं की, ‘माझं गाव सातारा आहे आणि कमळी कोल्हापूरची आहे. तर थोडाफार बेस माहीत होता. पण कोल्हापुरची लोकं जरा रांगडी भाषा वापरतात, त्यासाठी मात्र नक्की अभ्यास केला. काही कोल्हापुरी स्टँडअप कॉमेडियन्सचे व्हिडिओ १५ दिवस पाहिले कारण शूट सुरू व्हायला वेळ होता. त्यावेळात भाषेचा अभ्यास करून घेतला. भाषा रोज ऐकून ऐकून त्याचा लहेजा समजून घेत नंतर ही भूमिका साकारली’
कबड्डी खेळ खेळण्यासाठी कशी तयारी केली?
कमळी या मालिकेत महत्त्वाचा खेळ कबड्डी वापरला गेला आहे आणि त्यासाठी कशी तयारी केली सांगताना ‘कधीच कबड्डी खेळले नव्हते. पण जसजसे शूट होत गेले तसा इंटरेस्ट वाढला आणि शूटसाठी कबड्डीची टीम येते त्यांच्याकडून योग्य प्रशिक्षण घेत आपण खरं खेळत आहोत हे वाटावं यासाठी फूट वर्क, तालीम शिकून घेत आहे आणि योग्य खेळण्याचा अजूनही प्रयत्न करत आहे’ असं अगदी सहजपणाने आणि नम्रतेने विजयाने नमूद केले.
मालिकेचा विषय हा खूपच प्रतिभावान आणि बरंच काही प्रेरणा देऊन जाणारा असल्यानेच आपण ही मालिका स्वीकारली असंही विजया यावेळी म्हणाली.
‘कमळी’ची जागतिक झेप, न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकला मराठी मालिकेचा प्रोमो
कमळी आणि विजयामध्ये काय साम्य आहे?
विजयाने सांगितले की, ‘कमळी आणि विजया या दोघींचे बरेच गुण साधर्म्य साधणारे आहेत. मुळात कमळीमधील जिद्द विजयामध्ये आहे. एखादी गोष्ट पाहिजे असेल तर त्याच्या मागे ती मिळेपर्यंत कष्ट आणि मेहनत करण्याची दोघींची दोघींचीही जिद्द आहे. कमळीची भूमिका ही अत्यंत स्ट्राँग आहे आणि विजयादेखील खऱ्या आयुष्यात खूपच स्ट्राँग आहे. फक्त कमळी प्रचंड धाडसी आहे आणि तितकी विजया कदाचित धाडसी नाहीये’ असंही विजयाने यावेळी म्हटले.
याशिवाय सध्या कमळी या मालिकेला प्रचंड चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि यामुळे आपल्यावर एक मोठी जबाबदारी असल्याचंही विजयाने यावेळी आवर्जून सांगितले. ही भूमिका चोख पार पाडण्याची जबाबदारी असून अधिक मेहनत करून प्रेक्षकांच्या मनात तसंच स्थान कायम राहील यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही विजया यावेळी म्हणाली. तसंच तिने आपल्या प्रेक्षकांना आणि वाचकांना दिवाळीच्या भरभरून शुभेच्छाही दिल्या आहेत.
‘कमळी’ मालिकेत कबड्डीचा थरारक ट्रॅक; टीम कमळी vs टीम अनिका एकमेकांना भिडणार