सूरज चव्हाणचा 'राजा राणी' सिनेमा रिलीज, किरण मानेची बिग बॉस विजेत्यासाठी खास पोस्ट
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनची ट्रॉफी सूरज चव्हाणने जिंकली आहे. त्याने आपल्या नावावर ही ट्रॉफी केल्यानंतर सर्व स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे. खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी त्यासोबतच सोशल मीडियावर अक्षरश: चाहत्यांकडून पोस्टवर कमेंट्स, रिल्स आणि इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. या सर्वांनंतर बिग बॉस मराठी ४ च्या स्पर्धकाने इन्स्टा पोस्ट शेअर करत सूरज चव्हाणचं कौतुक केलं आहे.
अभिनेता किरण माने कायमच आपल्य वक्तव्यांमुळे चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतो. किरण मानेने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा विनर झालेल्या सूरज चव्हाणचे तोंडभरून कौतुक केले आहे. डाऊन टू अर्थ असलेल्या सूरज चव्हाणचे अभिनेत्याने तोंडभरून कौतुक केलेले आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये किरण माने म्हणतात, “मराठी मनोरंजन क्षेत्रात यश, पैसा, प्रसिद्धी हे कुणाला मिळावं याची गणितं आपल्या डोक्यात फिट्ट करून दिली गेलेली आहेत. टीव्ही रिॲलिटी शो मध्ये लायक नसूनही एखाद्या शहरी, गोर्यापान, चलाख पोराला ट्रॉफी दिली की बहुतांश लोकांना फारसं आश्चर्य वाटत नाही… म्हणजे ‘तो विनर नव्हताच’ वगैरे ट्रोलींग होतं, पण ‘होता है, चलता है’ असं वाटून विषय संपतो. पण गरीब, ओबडधोबड, गावरान, भाबड्या माणसानं ट्रॉफी उचलली की लै गदारोळ होतो. ‘गरीबी बघून सहानुभूतीनं त्याला हे दिलंय’, ‘त्याला हे यश टिकवताच येणार नाही’ अशा टिप्पण्या सुरू होतात.”
“‘आता दारिद्र्य दाखवुन रडारडी करा आणि ट्रॉफी मिळवा’ अशी हेटाळणी केली जाते. मनोरंजनाच्या गोर्यापान, चकचकीत, झगमगीत विश्वात असा फाटका माणूस लोकांना ‘उपरा’ वाटतो. सुरज चव्हाणविषयी जे निगेटिव्ह बोललं जातंय त्याचं मुळ कारण हे आहे ! एक विसरू नका भावांनो, सुरज बिग बॉसच्या घरात आला तेच मुळात स्वबळावर ! बिग बॉसच्या ऑफरला सुरूवातीला ‘नाही’ म्हणणारा तो एकमेव स्पर्धक होता हे ही लक्षात घ्या. इतर स्पर्धकांसारखा पैशानं मजबूत वगैरे नव्हता किंवा मनोरंजन विश्वातला नव्हता. अशा पोरानं मिळालेल्या संधीचं सोनं केलंय हे सत्य मान्य करा. अनेकांनी अशी टीका केलीय की सुरज खेळलाच नाही. तर बिग बॉस हा ‘टास्क’ जिंकण्याचा खेळ नाही. बिग बॉस हा विपरित परिस्थितीतल्या तुमच्या वागण्या-बोलण्यातनं प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा खेळ आहे.”
“म्हणून तर हिंदी-मराठीत काही अशीही उदाहरणं आहेत की ट्रॉफी उचललेल्या कित्येकांना लोक विसरून गेले… पण मनं जिंकलेले कित्येक लोक प्रेक्षकांच्या काळजात आहेत. अठरा वर्षांपुर्वी बिग बॉस हिंदीचा पहिला सिझन राहुल रॉयनं जिंकला होता. पण त्यात प्रेक्षकांना भावलेली राखी सावंत आजही एन्टरटेनमेन्ट क्विन आहे आणि रवि किशन भोजपुरीत सुपरस्टार आहे. सुरज ट्रॉफी जिंकला नसता तरी एवढाच लोकप्रिय असता! यश-प्रसिद्धी मिळवायला तुमच्याकडे ‘टॅलेन्ट’ पाहिजे, अंगी ‘कर्तृत्व’ पाहिजे आणि ‘संधी’ मिळाली पाहिजे. या तिन्हीत सुरज यशस्वी ठरला. आता हे यश आणि प्रसिद्धी टिकवण्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत लागते… ती दाखवली तर तो टिकेलही.”
“किमान आत्ता तरी मराठी इंडस्ट्रीच्या तळ्यात पोहोणार्या बदकांमध्ये गांवखेड्यातनं नितळ-निर्मळपणा घेऊन स्वबळावर आलेल्या पिल्लाला ‘कुरूप वेडा’ ठरवू नका. कदाचित आत्तापर्यन्तच्या कॉमेडियन्स, परफॉरमर्स, एन्टरटेनर्सना बुक्कीत टेंगुळ आणणारा तो एक ‘राजहंस’ ठरू शकतो. लब्यू सुरज… होऊन जाऊदे झापुक झुपूक !”