(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘गुम है किसीके प्यार में’ ही बहुचर्चित मालिका सस्पेन्स, रोमान्स आणि नाट्यमय वळणांचा नवा अध्याय उलगडण्यासाठी सज्ज आहे. ही मालिका प्रेम, त्याग आणि भावनिक अशांततेमागील गुंतागुंतीचा शोध घेत असताना, या मालिकेतील आगामी भागांत त्यामधील पात्रांची तीव्रता अधिक वाढवून प्रेक्षक छोट्या पडद्यावर खिळून राहतील, अशी योजना आकार घेत आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या लवकरच भेटीस येणार आहे.
सौंदर्य आणि प्रगल्भ प्रतिभेचा अखेरचा शब्द असलेल्या अभिनेत्री रेखाने ‘गुम है किसीके प्यार में’ या मालिकेत खास उपस्थित राहून मालिकेत नव्याने पदार्पण करणाऱ्या कलाकारांची तिने ओळख करून दिली आहे. हा क्षण साऱ्यांकरताच खास ठरला आहे. कित्येक पिढ्यांना आपल्या सौंदर्याने घायाळ करणाऱ्या दिग्गज अभिनेत्री रेखाच्या धीरगंभीर आवाजातील हा प्रोमो आहे. या प्रोमोची सुरुवात एका वेधक दृश्याने होते, ज्यात सनम जोहर, जो एक रॉकस्टार आहे, त्याचे रंगमंचावर सादरीकरण सुरू असते, तर तेजस्विनी (वैभवी हंकारे) त्याच्याकडे प्रेमभरल्या नजरेने बघत असते. मात्र, हा प्रोमो जसजसा पुढे सरकतो, तशी रेखाच्या आवाजात प्रेक्षकांना एकतर्फी प्रेमाच्या प्रवासाची गाथा ऐकायला मिळते. तेजस्विनीच्या प्रेमभंगाकडे दृश्य वळत असताना, पुढे जे नाट्य उलगडत जाणार आहे, त्याकरता रेखाच्या स्वरातील कथन कातर, भावनिक होत जाते.
वैभवी हंकारे या अभिनेत्रीने तेजस्विनी ही व्यक्तिरेखा साकारली आहे. प्रेमाचा अंशही नसलेल्या वैवाहिक जीवनात पत्नी म्हणून तिला जी कर्तव्ये निभावायची आहेत, त्यात आणि तिच्या भूतकाळातील प्रेमाविषयी तिला कायम वाटत राहणाऱ्या उत्कटतेत ती अडकलेली दिसते. सनम जोहरची व्यक्तिरेखा अशी आहे, जो तिला एकेकाळी त्याच्या करिअरसाठी सोडून गेला होता, तो तिच्या आयुष्यात परततो, जुन्या भावना पुन्हा जागृत होतात आणि अंतर्गत संघर्ष निर्माण होतो. त्याच वेळी, परम सिंगची व्यक्तिरेखा तेजस्विनीला एक नवा प्रारंभ करायची संधी देते, मात्र तिला भूतकाळातील प्रेमातून पुढे सरकणे कठीण जाते. या ‘प्रोमो’त तेजस्विनीच्या मनाची होणारी रस्सीखेच दर्शवण्यात आली आहे, जी प्रेमहीन वैवाहिक जीवनात अडकली आहे, तिला कधीही मिळू न शकलेल्या प्रेमाची आठवण तिच्या मनात जागी होत आहे.
राजकुमार राव आणि पत्रलेखाने चाहत्यांना दिली गुड न्यूज; सुंदर नोटसह सोशल मीडियावर केली पोस्ट शेअर!
दिग्गज अभिनेत्री रेखाचे प्रोमोमध्ये दिसणे हा एक सिनेमॅटिक जादूई क्षण आहे. या मालिकेमध्ये प्रेक्षकांना एक नवा अनुभव पाहायला मिळणार आहे. तसेच ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडणार आहे. अतुलनीय अभिनय कौशल्य आणि निखळ सौंदर्य याकरता ओळखल्या जाणाऱ्या रेखाचे ‘गुम है किसीके प्यार में’ आणि ‘स्टार प्लस’ वाहिनीवर या निमित्ताने झालेले आगमन या मालिकेची भव्यता वाढवते. रेखाची उपस्थिती अधिक संस्मरणीय बनते. ३० जानेवारीपासून म्हणजेच आज पासून ‘स्टार प्लस’वर रात्री ८ वाजता प्रसारित होणाऱ्या ‘गुम है किसीके प्यार में’ या मालिकेतील ही नवी नवलाई पाहायला मिळणार आहे.