(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
कोल्डप्लेचा आघाडीचा कलाकार ख्रिस मार्टिनने रविवारी अहमदाबादमधील त्याच्या संगीत कार्यक्रमात भारतीयांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणादरम्यान त्यांनी ‘वंदे मातरम’ आणि ‘माँ तुझे सलाम’ ही गाणी गायली आणि ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छाही दिल्या. त्याच्या सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले, त्यानंतर संपूर्ण संगीत मैफिल टाळ्यांच्या कडकडाटात गुंजली होती.
भारत मातेला अभिवादन करून संगीत कार्यक्रमाचा शेवट झाला.
ख्रिस मार्टिनने ‘माँ तुझे सलाम’ या गाण्याने संगीत कार्यक्रमाचा समारोप केला आणि सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या संगीत कार्यक्रमादरम्यान आणखी एका खास क्षणी, ख्रिसने भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहला एक सुंदर गाणे समर्पित केले. मार्टिनने गमतीने कबूल केले की जसप्रीत बुमराहने त्याच्या वेगवान गोलंदाजीने ज्या पद्धतीने इंग्लिश फलंदाजी लाईनअप उध्वस्त केली ते त्याला आवडले नाही. तो म्हणाला, “अरे जसप्रीत बुमराह, माझा प्रिय भाऊ. क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज. तू इंग्लंडला विकेटवर संपवताना पाहून आम्हाला आनंद झाला नाही.” असे त्याने या कॉन्सर्टमध्ये म्हणाले.
ख्रिस मार्टिन हिंदीत म्हणाला
अहमदाबादमधील संगीत कार्यक्रमात, ख्रिसने हिंदीत “आम्हाला लाईव्ह स्ट्रीमवर पाहणाऱ्या सर्वांना नमस्कार” असे म्हटले तेव्हा प्रेक्षकांचा उत्साह द्विगुणीत झाला. तो पुढे म्हणाला, “तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे, तुम्ही आम्हाला सादरीकरण करण्याची संधी दिली, आम्हाला खूप आनंद झाला आहे.” शनिवारी याआधी ख्रिसने चाहत्यांना गुजरातीमध्येही संबोधित केले होते. यामुळे भारतीय प्रेक्षकांमध्ये त्याची लोकप्रियता वाढत आहे. चाहत्यांना कॉन्सर्टमध्ये त्याचा अंदाज पाहून खूप आनंद झाला.
हॉटस्टारवर लाईव्ह-स्ट्रीमिंग
डिस्ने प्लस हॉटस्टार इंस्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कोल्डप्लेचा फ्रंटमन क्रिस हे गाणे गात असल्याचे दिसून येते. रविवारचा हा कार्यक्रम डिस्ने प्लस हॉटस्टारवर लाईव्ह-स्ट्रीम करण्यात आला. यापूर्वी, भारतीय गायिका जसलीन रॉयलने कोल्डप्लेचा फ्रंटमन ख्रिस मार्टिनसोबत स्टेजवर बँडच्या नवीनतम अल्बम मून म्युझिकमधील ‘वी प्रे’ हे गाणे जोडीने गायले होते.