Aryan Khan (Photo Credit- X)
The Ba*ds of Bollywood: प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) दिग्दर्शकाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर आला आहे. नेटफ्लिक्स (Netflix) आणि रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनलेल्या ‘The Ba*ds of Bollywood’ या वेब सीरिजचा पहिला टीझर रिलीज झाला आहे. या सीरिजच्या माध्यमातून आर्यन खान एका नव्या आणि हटके अंदाजात चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. अद्याप नेटफ्लिक्सने या सीरिजच्या रिलीजची अधिकृत घोषणा केली नसली तरी, यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
टीझरची सुरुवात एका रोमँटिक आणि क्लासिक शैलीने होते, जी प्रेक्षकांना ‘मोहब्बतें’ सारख्या जुन्या चित्रपटांची आठवण करून देते. पण प्रेक्षक या रोमान्समध्ये हरवताच, एक मजेदार ट्विस्ट येतो, जो कथेला पूर्णपणे नवीन रूप देतो. टीझरमधील आवाज तुम्हाला नक्कीच शाहरुख खानची आठवण करून देईल, पण त्यातील ॲटिट्यूड आणि टोन पूर्णपणे आर्यन खानचा आहे. यावरून हे स्पष्ट होते की, आर्यन आपल्या वडिलांच्या प्रतिमेपेक्षा वेगळे असे स्वतःचे सिनेविश्व निर्माण करण्याच्या तयारीत आहे.
पहिल्याच क्षणात आर्यन खान म्हणतो, “बॉलिवूड… ज्याला तुम्ही वर्षानुवर्षे प्रेम दिले आणि वार (हल्ला) पण केला, मी तेच करेन. खूप सारे प्रेम… आणि थोडासा वार.” या डायलॉगमुळे प्रेक्षकांना या सीरिजमध्ये केवळ ग्लॅमर आणि रोमान्सच नव्हे, तर भरपूर मसाला, खोचक आणि विनोदही पाहायला मिळेल. ‘The Ba*ds of Bollywood’ ही केवळ एक वेब सीरिज नसून, ती बॉलिवूडच्या बदलत्या विचारसरणीचे आणि दृष्टिकोनाचेही दर्शन घडवते. एका बाजूला जुन्या चित्रपटांची रोमँटिक शैली आहे, तर दुसऱ्या बाजूला आर्यन खानने त्यात आजच्या तरुण पिढीचा बोल्ड आणि स्टायलिश अंदाज जोडला आहे.
या सीरिजची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याची स्टारकास्ट. यामध्ये बॉबी देओलसोबत लक्ष्य, साहेर बम्बा, मनोज पाहवा, मोना सिंह, मनीष चौधरी, राघव जुयाल, अन्या सिंह, विजयंत कोहली आणि गौतमी कपूर यांसारखे अनेक दिग्गज कलाकार आहेत. एवढी मोठी आणि प्रतिभावान स्टारकास्ट पाहून चाहत्यांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. या सीरिजची निर्मिती गौरी खान करत असून, बॉनी जैन आणि अक्षत वर्मा त्याचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर आहेत.