(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या २५ वर्षांपासून ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय गेम शोचे सूत्रसंचालन करत आहेत. त्यांच्या खास शैलीमुळे हा कार्यक्रम आजही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान राखून आहे. बच्चन यांच्या लोकप्रिय गेम शो ‘कौन बनेगा करोड़पति’ (KBC) चा सिझन 17 सध्या चर्चेत आहे. नुकताच 10 वर्षांचा इशित भट्ट हा स्पर्धक म्हणून शोमध्ये सहभागी झाला होता. मात्र, शोदरम्यान त्याच्या वागणुकीमुळे तो सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाला. ओव्हरकॉन्फिडन्समुळे इशितला शेवटी शून्य रकमेवरच शोमधून घरी परतावं लागलं. मोठ्या प्रमाणात झालेल्या ट्रोलिंग आणि टीकेनंतर इशितने आपल्या वागणुकीबद्दल माफी मागितली आहे. त्याने सांगितलं की तो खूप घाबरलेला होता.
खरं तर, इशित भट्टला अमिताभ बच्चन यांच्याशी वागण्याच्या पद्धतीमुळे सोशल मीडियावर टीकेला सामोरं जावं लागलं. 5वीत शिकणाऱ्या या स्पर्धकाने त्यानंतर आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करून माफी मागितली.
या व्हिडिओसोबत त्याने लिहिलं आहे, “सर्वांना नमस्कार, केबीसीमधील माझ्या वागण्याबद्दल मी मनापासून माफी मागतो. मी ज्या पद्धतीने बोललो, त्याचे अनेकांना वाईट वाटले. हे जाणून मला वाईट वाटले. मला खरोखरच याबद्दल पश्चाताप वाटतो. त्यावेळी (अमिताभ बच्चन यांच्यासमोर) मी घाबरलो होतो. त्यावेळचे माझे वर्तन पूर्णपणे चुकीचे होते. मला उद्धटपणे वागायचे नव्हते. मी अमिताभ बच्चन सर आणि संपूर्ण केबीसीच्या टीमचा मनापासून आदर करतो.”
त्याने पुढे लिहिलं आहे, “या अनुभवातून आता मला नम्रपणा आणि जागरूक मनाचा चांगला धडा मिळाला आहे. आपले शब्द आणि कृती यातून आपण कोण आहोत, हे कसे दिसते, याबद्दलही या प्रसंगातून मी शिकलो आहे. यापुढे मी अधिक नम्र, आदराने आणि विचारपूर्वक वागण्याचा प्रयत्न करेन, असे वचन देतो.”
इशित भट्टच्या कथित पोस्टवर अनेक युजर्सच्या कमेंट आल्या आहेत. माफी मागण्याच्या या कृतीचे अनेकांनी कौतुक केले आहे. तर काहींनी केबीसीमधील त्याच्या वर्तनाची पुन्हा खिल्ली उडवली. एका युजरने लिहिले, “इशित लहान मुलगा आहे. त्याने चूक केली. जी त्याला आता कळली आहे. त्याने माफी मागितली.