(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
काही भूमिका अशा असतात, ज्या केवळ अभिनयापुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यालाही स्पर्श करून जातात. अशीच एक भूमिका साकारताना अंगिरा धर यांनी स्वतःच्या जुन्या भीतीला सामोरं जाण्याचं धाडस केलं आहे. ‘माँ का सम’ या मालिकेत त्यांनी साकारलेलं ‘इरा’ हे पात्र पडद्यावर जितकं सहज आणि आत्मविश्वासपूर्ण दिसतं, तितकंच ते प्रत्यक्षात त्यांच्या आयुष्यातील एका कठीण टप्प्याशी जोडलेलं आहे.
या मालिकेत अंगिरा शांत आणि तर्कशुद्ध विचार करणाऱ्या गणित प्राध्यापकाच्या भूमिकेत दिसतात. अंक, तर्क आणि विश्लेषण यांच्या माध्यमातून जग पाहणाऱ्या या पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मात्र, या भूमिकेमागे एक वेगळीच कहाणी दडलेली आहे. कारण, खऱ्या आयुष्यात गणित हा विषयच त्यांच्या भीतीचं कारण असल्याचे दिसत आहे.
पाकिस्तानात ‘या’ 5 भारतीय चित्रपटांनी मारली बाजी! Netflix वर क्राइम थ्रिलर चित्रपट ठरला नंबर 1
आपल्या अनुभवाबद्दल बोलताना अंगिरा शांत म्हणाल्या, “लहानपणापासून गणित हा माझा सर्वात मोठा धाक होता. हा एकमेव विषय होता ज्यामुळे मला प्रचंड तणाव यायचा. घाम फुटायचा, भीती वाटायची आणि परीक्षेला बसणं टाळण्यासाठी मी कारणं शोधायचे. त्यामुळे या भूमिकेमुळे त्या सगळ्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.”
चित्रीकरणादरम्यान एक प्रसंग असा आला, ज्यामुळे त्या पूर्णपणे अस्वस्थ झाल्या. शेवटच्या क्षणी संवाद बदलल्याने त्यांना प्रचंड तणाव जाणवला. “त्या वेळी मला थोडा वेळ बाजूला जाऊन श्वसनाचा सराव करावा लागला. मी यापूर्वी कोणत्याही शूटिंगदरम्यान असा अनुभव घेतला नव्हता. ही फक्त भूमिका राहिली नव्हती, तर स्वतःसाठी पूर्ण करायचं एक वैयक्तिक आव्हान बनलं होतं,” असं त्यांनी सांगितलं.
‘माँ का सम’ ही मालिका भावनिक नातेसंबंध, कुटुंब आणि व्यक्तीच्या अंतर्मनातील संघर्ष यांना स्पर्श करणारी आहे. या मालिकेची निर्मिती बबिता आशिवाल यांनी युनोया फिल्म्स अंतर्गत केली आहे. दिग्दर्शन निकोलस खार्कोंगोर यांनी केले असून, कथा आणि लेखन रविंदर रंधावा आणि सुमृत शाही यांनी केलं आहे.
या मालिकेत मोना सिंग, मिहिर आहुजा आणि रणवीर ब्रार यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ही मालिका सध्या ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ वर हिंदी भाषेत उपलब्ध असून, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये उपशीर्षकांसह पाहता येते. एकंदरीत, ‘माँ का सम’ ही केवळ एक मालिका नसून स्वतःच्या भीतीवर मात करत पुढे जाण्याची प्रेरणादायी कथा आहे. अंगिरा धर यांचा हा प्रवास प्रेक्षकांसाठी नक्कीच भावनिक आणि प्रेरणादायी ठरणार आहे.






