(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग तसेच महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या सहकार्याने, अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समिती आणि निर्मिती मीडिया सोल्युशन्स यांच्या वतीने आयोजित ८ वा अण्णाभाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२५ याचा भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवार, २६ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI), लॉ कॉलेज रोड, पुणे येथे उत्साहात पार पडणार आहे. ही माहिती आयोजित पत्रकार परिषदेत महोत्सवाचे दिग्दर्शक संदीप ससाणे, प्रतिमा परदेशी, सहसंयोजिका नेहा भुकण आणि निलेश रसाळ यांनी दिली.
तीन दशकांनंतरही अव्वल स्थानी, Ekta Kapoor च्या यशाचं रहस्य काय? जाणून घ्या काय आहे कारण
महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखक आणि संपादक महावीरभाई जोंधळे आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘तुंबाड’ फेम आणि लवकरच प्रदर्शित होणाऱ्या मायासभा या चित्रपटाचे दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच, अभिनेत्री वीणा जामकर, अभिनेते दीपक दामले, निर्माते गिरीश पटेल, निर्माते अंकुर जे. सिंग, क्रिएटिव्ह कन्सल्टंट आशिष निनगुरकर, पिकल एंटरटेनमेंटचे प्रमुख समीर दिक्षित, ऋषिकेश भिरंगी, सुनील सुकथनकर, उमेश कुलकर्णी यांच्यासह अनेक नामवंत कलाकार, दिग्दर्शक आणि चित्रपट समीक्षक उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन समारंभानंतर लगेचच ‘मायासभा’ या बहुचर्चित हिंदी चित्रपटाचे ओपनिंग फिल्म म्हणून विशेष स्क्रिनिंग होणार आहे. सध्या प्रचंड चर्चेत असलेला राही अनिल बर्वे दिग्दर्शित ‘मायासभा’ हा चित्रपट पुण्यातील रसिक प्रेक्षकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. या प्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक राही बर्वे यांच्यासह अभिनेत्री वीणा जामकर, अभिनेते दीपक दामले, निर्माते गिरीश पटेल, अंकुर जे. सिंग, क्रिएटिव्ह कन्सल्टंट आशिष निनगुरकर तसेच समीर दिक्षित आणि ऋषिकेश भिरंगी उपस्थित राहणार आहेत.
‘मायासभा’ या चित्रपटात जावेद जाफरी मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे समजले आहे. हा चित्रपट जानेवारी २०२६ मध्ये संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटाची रिलीज तारीख अद्यापही समोर आलेले नसून, या चित्रपटाची कथा जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.






