(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
करिअरची तीन दशके पूर्ण करूनही एकता कपूर आज अशा टप्प्यावर उभी आहे, ज्याची स्वप्न अनेक अनुभवी लोक पाहतात. २०२५ हे वर्ष तिच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरलं आहे. याच वर्षी तिने आपला पहिला राष्ट्रीय पुरस्कार जिंकला, तिच्या दोन सर्वाधिक लोकप्रिय कथा नव्या रूपात पुन्हा प्रेक्षकांसमोर आणल्या, नव्या भाषांमध्ये कामाचा विस्तार केला आणि केवळ नॉस्टॅल्जियावर नाही, तर नव्या विचारांवर आधारित अशा प्रोजेक्ट्सची भक्कम यादी तयार केली.
९०च्या दशकापासून भारतीय प्रेक्षकांची आवड घडवणाऱ्या एकतासाठी हा काळ केवळ यशाचा उत्सव नसून, एका नव्या पर्वाची सुरुवात आहे.
एकता कपूरच्या नावावर हॅट्रिक
आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार आणि पद्मश्री मिळवल्यानंतर, २०२५ मध्ये ‘कठल’साठी एकता कपूरने आपला पहिला राष्ट्रीय पुरस्कार जिंकत यशाची हॅट्रिक पूर्ण केली. पुरस्काराची घोषणा १ ऑगस्ट २०२५ रोजी झाली, तर २३ सप्टेंबर २०२५ रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे झालेल्या समारंभात तिला हा मान प्रदान करण्यात आला. तीन दशकांहून अधिक काळ भारतीय प्रेक्षकांच्या सवयी आणि अभिरुची घडवणाऱ्या एकतासाठी हा सन्मान अगदी योग्य वेळी मिळाल्याची भावना व्यक्त होते.
‘क्योंकि सास भी कभी बहू थी’चे पुनरागमन
याच वर्षी ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या आयकॉनिक मालिकेचं नव्या अंदाजात पुनरागमन झालं. या मालिकेमुळे सोशल मीडियावर नॉस्टॅल्जियाची लाट पुन्हा उसळली आणि एकता कपूरचे टेलिव्हिजन शो आजही लोकांच्या सांस्कृतिक स्मृतींचा अविभाज्य भाग आहेत, याची पुन्हा एकदा प्रचिती आली.
पुढील दमदार लाइन-अप
करिअरच्या ३०व्या वर्षात सुरक्षित वाट निवडण्याऐवजी एकता कपूरने अधिक धाडसी पावलं उचलली आहेत. तिच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यावसायिक सिनेमा आणि कल्ट कथांचा प्रभावी संगम पाहायला मिळतो. प्रियदर्शन दिग्दर्शित ‘भूत बंगला’ ज्यात अक्षय कुमार, तब्बू आणि परेश रावल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा भव्य थिएटर रिलीज म्हणून सज्ज होत आहे.याशिवाय, मोहनलाल यांच्यासोबतची तिची पहिली पॅन-इंडिया फिल्म ‘वृषभा’ नोव्हेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित होणार असून, मलयाळम सिनेसृष्टीतील हा तिचा नवा आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी टप्पा मानला जात आहे.
TVF सोबतचं तिचे सहकार्य तिच्या कामाला नवा आयाम देत असून, तरुण आणि डिजिटल प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची त्यांची स्पष्ट आणि दूरदृष्टीची भूमिका अधोरेखित करतं.त्याचबरोबर, तिने आपली लोकप्रिय हॉरर फ्रँचायझी ‘रागिनी MMS’ पुन्हा सुरू केली आहे. सध्या हा प्रकल्प विकासाच्या टप्प्यात असला, तरी तमन्ना भाटिया प्रमुख भूमिकेत असणार असल्याच्या चर्चेमुळे रिलीजपूर्वीच तो चर्चेचा विषय ठरला आहे.
जागतिक पाऊल: नेटफ्लिक्ससोबत भागीदारी
या वर्षी बालाजी टेलिफिल्म्स आणि नेटफ्लिक्स इंडिया यांच्यात झालेली क्रिएटिव्ह पार्टनरशिप एकता कपूर पुढे कोणत्या दिशेने वाटचाल करत आहेत, हे स्पष्टपणे दर्शवते. या कराराअंतर्गत चित्रपट आणि वेब सिरीजचा समावेश असून, स्ट्रीमिंग जेव्हा मुख्य प्रवाहात आलं आहे अशा काळात हा निर्णय तिला जागतिक कंटेंट प्लॅटफॉर्मशी अधिक घट्टपणे जोडतो. ज्या काळात ९०च्या दशकात सुरुवात करणारे अनेक निर्माते आज संथ झाले आहेत, त्याच काळात एकता कपूर मात्र अजूनही पूर्ण वेगात कार्यरत आहे. जुन्या ब्रँड्सना नवसंजीवनी देणं असो, नवे चित्रपट घडवणं असो, नव्या इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करणं असो किंवा जागतिक स्तरावर आपली छाप उमटवणं, एकता कपूर आजही भारतीय मनोरंजनविश्वाच्या केंद्रस्थानी ठामपणे उभी आहे.






