फोटो सौजन्य - Social Media
बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि ‘गीता माँ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गीता कपूर या त्यांच्या स्पष्टवक्तेपणा, विनोदी स्वभाव आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्वामुळे कायम चर्चेत असतात. अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांतील गाण्यांना त्यांनी नृत्यदिग्दर्शन केले असून विविध डान्स रिअॅलिटी शोमधूनही त्यांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. 52 वर्षांच्या गीता कपूर यांनी अद्याप लग्न केलेले नसल्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता पाहायला मिळते.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गीता कपूर यांनी त्यांच्या लव्ह लाईफ, लग्नाच्या अफवा आणि सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीबाबत स्पष्टपणे भाष्य केले. तसेच त्यांना कोणत्या प्रकारे प्रपोज केलेले आवडेल, याबाबतही त्यांनी मजेशीर उत्तर दिले.
‘फिल्मीज्ञान’ या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत गीता कपूर यांना त्यांच्या आयुष्यातील जोडीदाराने कशा प्रकारे प्रपोज करावे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्या कोरिओग्राफर असल्यामुळे त्यांना डान्स करून प्रपोज केलेले आवडेल का, असेही विचारण्यात आले. यावर त्यांनी हसत प्रतिक्रिया दिली.
“मला प्रपोज करण्याची कोणतीही ठराविक पद्धत नाही. मात्र, एक गोष्ट नक्की सांगू शकते की, कोणीही मला डान्स करून प्रपोज करू नये. कारण त्याने मी अजिबात इम्प्रेस होणार नाही,” असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या उत्तरानंतर सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
दरम्यान, गीता कपूर यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेकदा विविध अफवा पसरत असतात. काही काळापूर्वी त्यांच्या कपाळावर सिंदूर असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर त्यांनी गुपचूप लग्न केल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते. मात्र, या सर्व अफवांचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट शब्दांत खंडन केले.
लग्नाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “मी लग्न केले आहे, अशी अफवा अनेक वेळा पसरवली गेली. मी गुपचूप लग्न केलं, असेही अनेकदा म्हटले गेले. पण त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. जर मी खरोखर लग्न केले असते, तर मी अभिमानाने सर्वांना सांगितले असते. माझा नवरा आणि मुलं असतील तर त्याबद्दल लपवण्यासारखं काहीच नाही. त्यामुळे अशा निराधार अफवा पसरवणं थांबायला हवं.”
याच मुलाखतीत त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या संपत्तीबाबत पसरवल्या जाणाऱ्या दाव्यांवरही भाष्य केले. अनेक संकेतस्थळांवर आणि सोशल मीडिया पोस्टमध्ये गीता कपूर यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचे दावे केले जातात. मात्र, यावर त्यांनी मिश्कील शैलीत प्रतिक्रिया दिली.
“अनेकदा मी वाचते की माझ्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे. तेव्हा मलाच प्रश्न पडतो की ही संपत्ती नेमकी कुठे आहे? मला त्या आलिशान बंगल्यात राहायला आवडेल आणि त्या महागड्या गाड्यांमधून फिरायलाही आवडेल. बँक खात्यात कोट्यवधी रुपये असल्याचे सांगितले जाते, पण ते पैसे कुठे आहेत हे मलाच माहीत नाही,” असे त्या हसत म्हणाल्या.
पुढे बोलताना गीता कपूर यांनी सांगितले की, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित कलाकारांबाबत अशा प्रकारच्या अफवा अनेकदा पसरवल्या जातात. मात्र, त्यामध्ये वास्तवापेक्षा कल्पनारंजन अधिक असते. “सरकारला आमच्या मालमत्तेची संपूर्ण माहिती असते आणि आम्ही त्यानुसार करही भरत असतो. त्यामुळे अशा बातम्या वाचल्या की मलाच आश्चर्य वाटतं,” असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, गीता कपूर यांच्या या स्पष्टवक्त्या आणि विनोदी उत्तरांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यांच्या प्रामाणिकपणा आणि स्पष्ट भूमिकेचे चाहते कौतुक करत असून, वैयक्तिक आयुष्याबाबत त्यांनी दिलेल्या स्पष्ट उत्तरांमुळे त्या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.






