CJP Protest: "विद्यार्थी जिथे सांगतील तिथे चर्चेला तयार!"; केंद्र सरकारची मोठी ऑफर
CJP Protest: NEET पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात आंदोलन सुरू असताना रस्त्यापासून संसदेपर्यंत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टी (CJP) केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहे. या सगळ्या गदारोळात केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सरकार विद्यार्थ्यांशी कोणत्याही ठिकाणी चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगत आंदोलनकर्त्यांना चर्चेचे आवाहन केले.
जितेंद्र सिंह म्हणाले, “सरकारच्या वतीने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी आवाहन करू इच्छितो की, आम्ही चर्चेसाठी नेहमीच तयार आहोत. सरकारचे दरवाजे खुले आहेत. विद्यार्थ्यांना ज्या वेळी आणि ज्या ठिकाणी सोयीचे वाटेल, तेथे आम्ही चर्चा करण्यासाठी येण्यास तयार आहोत. आंदोलनाव्यतिरिक्त इतर मुद्द्यांवरही सरकार संवादासाठी तयार आहे.”
जितेंद्र सिंह म्हणाले की, “विद्यार्थी जितका वेळ मागतील तितका वेळ आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि मी स्वतः या विद्यार्थ्यांशी चर्चा करू. संवादातूनच या प्रश्नावर तोडगा निघू शकतो आणि त्यातून पुढील मार्गही निश्चित होऊ शकतो. तुम्ही जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी बोलावा किंवा मंत्रालयात, आम्ही तेथे चर्चेसाठी येऊ. आमच्यासाठी हा प्रतिष्ठेचा प्रश्न नाही. सरकारकडून विद्यार्थी आणि त्यांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी आतापर्यंत चार वेळा निमंत्रण देण्यात आले आहे,” असेही त्यांनी सांगितले.
याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील या प्रकरणाबाबत अत्यंत संवेदनशील आहेत. युवकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची भूमिका पंतप्रधानांनी स्पष्ट केली आहे. पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर जलदगती न्यायालयाद्वारे (फास्ट ट्रॅक) कारवाई करून त्यांना लवकरात लवकर शिक्षा देण्याचा निर्णयही याच भूमिकेतून घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चर्चेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे तोडगा शोधण्यासाठी पुढे यावे,” असे आवाहन जितेंद्र सिंहांनी केलं आहे.
दरम्यान, २० जुलैला सीजेपीचे प्रवक्ता सौरभ दास आणि आशुतोष रांका गेले होते. पण पाच तास बसवून जे.पी. नड्डा यांनी कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही, असा आरोप सीजेपीकडून करण्यात आला होता. त्यानंतर आता कॉकरोच जनता पार्टीने सरकारसमोर आपल्या मागण्या आधीच मांडल्याचे सांगितले असून आता सरकारला चर्चा करायची असेल तर त्यांनी स्वतः जंतर-मंतर येथे यावे, अशी भूमिका घेतली आहे. CJPच्या प्रतिनिधीमंडळाने केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा करण्यास नकार दिला आहे.
यापूर्वी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी सरकार आंदोलकांशी कोणत्याही वेळी चर्चा करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. मात्र, ही चर्चा त्यांच्या निवासस्थानी किंवा मंत्रालयातच होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. तसेच, गेल्या दोन दिवसांत सरकारकडून चार वेळा चर्चेचे निमंत्रण देण्यात आले असूनही CJPकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याचा दावाही त्यांनी केला.






