फोटो सौजन्य - Social Media
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये झरीन नवीन कपड्यांचे कलेक्शन दाखवत असताना एका छायाचित्रकाराने, “ट्राय करून दाखवा ना,” अशी टिप्पणी केली. त्यावर झरीनने संतप्त होत, “तुमच्यासमोर ट्राय करू? ते शक्य नाही. माझ्यासोबत अशा फालतू गोष्टी करू नका. मी हे अजिबात सहन करणार नाही,” असे स्पष्टपणे सांगत संबंधिताला खडसावले. यावेळी झरीनने गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूर राहण्यामागचे कारणही सांगितले. तिची आई परवीन खान दीर्घकाळ आजारी असल्यामुळे तिच्या उपचार आणि देखभालीतच ती पूर्णपणे व्यस्त होती. एप्रिलमध्ये आईचे निधन झाल्यानंतर आता पुन्हा अभिनय क्षेत्रात सक्रिय होण्याची तयारी सुरू असल्याचे तिने सांगितले.
2010 मध्ये सलमान खानसोबत ‘वीर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या झरीनने ‘रेडी’, ‘हाऊसफुल 2’, ‘हेट स्टोरी 3’, ‘अक्सर 2’ आणि ‘1921’ यांसारख्या चित्रपटांत भूमिका साकारल्या. 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अकेले हम अकेले तुम’ या चित्रपटानंतर ती रुपेरी पडद्यापासून दूर होती. झरीनच्या मते, सध्या OTT प्लॅटफॉर्मवर दर्जेदार आणि आशयपूर्ण प्रकल्प तयार होत आहेत. त्यामुळे केवळ ग्लॅमरस भूमिकांपुरते मर्यादित न राहता, अभिनयाची क्षमता सिद्ध करण्याची संधी देणाऱ्या भूमिका साकारण्याची तिची इच्छा असून, नव्या उत्साहाने पुनरागमन करण्यासाठी ती सज्ज असल्याचे तिने स्पष्ट केले.






